Home नांदेड अर्धापुर शहरात बंदुकीच्या धाकावर भर दुपारी 3 लाख 50 हजार रुपयांची लुट

अर्धापुर शहरात बंदुकीच्या धाकावर भर दुपारी 3 लाख 50 हजार रुपयांची लुट

354

नांदेड प्रतिनिधी / राजेश एन भांगे

अर्धापूर : शहरातील एटीएम मशीनमध्ये रोकड भरताना छऱ्याची बंदूक दाखवत धाडसी चोरी केल्याची घटना आज दुपारी घडली.
केवळ एका मिनिटात चोरट्यांनी तब्बल ३ लाख ५० हजार रुपये हिसकावुन घेत स्पोर्ट बाईकवरून पळ काढला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुख्य रस्त्यावर बसवेश्वर चौकात वानखेडे कॉम्प्लेक्स येथे इंडिया-१ हे खाजगी कंपनीचे एटीएम आहे. आज दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास एटीएम मशीनमध्ये रोकड भरण्यासाठी मुक्तारोद्दीन गौस महेनोद्दीन गौस ( रा.माणिकनगर नांदेड ) हा कर्मचारी आला.
यावेळी दोन चोरट्यांनी एटीएम समोर स्पोर्ट बाईक उभी केली. एकजण आत गेला आणि कर्मचाऱ्यावर बंदुकीतून छऱ्याचा मारा केला. जखमी अवस्थेतील कर्मचाऱ्याच्या हातातील रोकड असलेल्या पिशवी घेऊन पळ काढत बाहेर उभ्या दुचाकीवरून पळ काढला. पिशवीत ३ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती आहे. चोरी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. चोरीची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय कबाडे,उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासा संदर्भात सुचना दिल्या.
पोलिस निरीक्षक अशोक जाधव,पोलिस उपनिरीक्षक महमंद तयब्ब, सपो उपनि विद्यासागर वैद्ये, जमादार भिमराव राठोड,गुरूद्वारा आरेवार,महेंद्र डांगे पुढील तपास करत आहेत.
एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर
या परिसरात चोरीची ही दुसरी घटना आहे. एटीएमवर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी अशी सूचना पोलिस प्रशासनाने वारंवार देऊन ही संबंधितांनी कोणतीही उपाय योजना केल्या नाहीत.
या चोरी प्रकरणी पोलिस बारकाईने तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन जलद गतीने कार्य करत आहे.