Home बुलडाणा आघोरी! स्मशानातून चक्क प्रेताची राख चोरी ,

आघोरी! स्मशानातून चक्क प्रेताची राख चोरी ,

561

 

नातलग धस्तवाले,पोलिसात धाव

 

बुलडाणा ( प्रशांत खंडारे) :

 

खडा पहारा असला तरी, कुठे-कधी आणि काय चोरीला जाईल हे सांगता येत नाही. तसे शहरात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत आणि घडतात. मात्र मंगळवारच्या अमावस्येच्या पार्श्वभूमीवर काल रात्री विचित्र घटना घडली. येथील संगमतलाव स्मशानभूमीतून एका मृतदेहाची राख आणि अस्थिच चोरीला गेल्याचा अघोरी प्रकार आज उजेडात आला आहे. मृतकाचे नातेवाईक जेव्हा अस्थी “सावडण्या”साठी स्मशानात पोहोचले तेव्हा नातलगांना प्रचंड धक्का बसला.*

या घटनेचा अभय सोनोने यांनी सांगितलेला वृत्तांत असा की, शहरातील जुनागाव येथील 48 वर्षीय सौ. संगीता संतोष सोनवणे यांचे काल दुपारी अकोला येथे दुर्धर आजारामुळे निधन झाले. त्यांचे प्रेत बुलढाण्यात आणण्यात आले. कालच त्रिशरण चौकातील संगमतलाव स्मशानभूमीत त्यांचा अंत्य संस्कार करण्यात आला. आज मंगळवारी त्यांचा राख सावडण्याचा कार्यक्रम होता. दुःखाच्या सावटामध्ये आप्तेष्ट स्मशानात विधी पूर्ण करण्याकरिता पोहोचले. मात्र जिथे मृतदेहाला दाह देण्यात आला होता. तेथून मृतदेहाची राख आणि अस्थी दिसून आली नाही. या अनपेक्षित आणि पहिल्याच घटनेमुळे सर्वांनाच प्रचंड धक्का बसला. दरम्यान मृतदेहाची राख आणि अस्थी चोरीला गेल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. हा अघोरी प्रकार असल्याची चर्चा झडत असून शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन तपास कार्याला सुरुवात केली. आज अमावस्या असल्याने “धनप्राप्ती व्हावी, गुप्त धन मिळावे, कोणा एकाचे वाईट करणे, जादूटोण्याने करणी करणे, असे अमानुष, अनिष्ठ कृत्यासाठी प्रेताची राख किंवा अस्थींचा प्रयोग केल्या जात असल्याच्या घटना घडत असतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंमलात असला तरी ह्या घटना वाढत आहे. सदर मृतदेहाची राख व अस्थी कोणी लंपास केली आणि कशासाठी? याचा तपास शहर पोलिस करीत आहेत. पोलिसांसमोर ही घटना म्हणजे एक आव्हानच आहे.