Home मुंबई पत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने...

पत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे आयोजन

194

भारताचा विक्टरी पंच जगाला दाखवण्याची सर्वोत्तम संधी- क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण

मुंबई – ‌टोक्यो ऑलिम्पिकचे बिगूल वाजले आहे. आज होणाऱ्या उद्घाटनापासून प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होत आहे. यानिमित्ताने पत्र सूचना कार्यालय आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या वतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या वेबिनारचे आयोजन केले होते. टोक्योमध्ये वार्तांकनासाठी गेलेले  क्रीडा  पत्रकार संदीप चव्हाण, न्यूज डंका पोर्टलचे सहायक संपादक महेश विचारे आणि मुक्त पत्रकार शैलेश पाटील यांनी वेबिनारमध्ये सध्याची कोरोना परिस्थिती आणि भारतीय क्रीडापटुना पदक जिंकण्याची असलेली संधी आदी विषयावर भाष्य केले. 

टोक्योमध्ये खेळाडूंच्या आरोग्याची अतिशय योग्य काळजी घेतली जात आहे. यासाठी खेळाडूंचेही पूर्ण सहकार्य मिळत आहे. कोरोना काळात एकत्र येत एकमेकांना धीर देण्याची शिकवणूक खेळाडूंनी जोपासली आहे असे तिथल्या प्रत्यक्ष स्थिती विषयी संदीप चव्हाण यांनी सांगितले. अतिशय आव्हानात्मक काळात स्पर्धा होत असल्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीकडे पूर्वीच्या निकषांप्रमाणे पाहू नये, असे आवाहन संदीप चव्हाण यांनी केले. 

ऑलिम्पिकमध्ये जय-पराजयाला फारसे महत्त्व नाही, तर तुम्ही कशी लढत देता हे महत्त्वाचे आहे   आणि यंदा मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूच्या संख्येने ते सिद्ध झाले आहे असे सांगत भारताचा विक्टरी पंच जगाला दाखवण्याची  ही सर्वोत्तम संधी असल्याचे चव्हाण म्हणाले . 

भारतीय खेळाडूंना सरकारी पातळीवर आर्थिक सहाय्य, भारतीय क्रीडा प्राधीकरण (SAI), बेंगळुरु येथील आंतरराष्ट्री दर्जाच्या सोयी-सुविधांनी युक्त स्पोर्ट अकादमी जिथे  खेळाडूंना  चांगला सराव करता आला. त्याचे परिणाम या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच दिसून येतील, असे मुक्त पत्रकार शैलेश पाटील म्हणाले. कोरोना काळातही खेळाडूंच्या सरावात व्यत्यय येऊ नये, यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले. खेळाडूंच्या लसीकरणासाठी सरकारने पुढाकार घेतला, याचा नक्कीच खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी उपयोग झाला शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंशी साधलेला संवाद आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी विमानतळावर येऊन क्रीडापटूंना दिलेल्या शुभेच्छा या खेळाडूंच्या मानसिकतेसाठी फार महत्त्वाच्या  होत्या असे पाटील म्हणाले

ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये महाराष्ट्राचा वाढलेला टक्का ही महाराष्ट्रीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे न्यूज डंका पोर्टलचे सहायक संपादक महेश विचारे म्हणाले. अतिशय बिकट परिस्थितीतून ऑलिम्पिकपर्यंत भरारी घेतलेला अमरावतीचा प्रवीण जाधव (तिरंदाजी) आणि बीडचा अविनाश साबळे (स्टीपल चेस) यांच्या कामगिरीवर जगाचे लक्ष असणार आहे. तसेच राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत (नेमबाजी), विष्णू सर्वानन (सेलिंग), चिराग शेट्टी (बॅडमिंटन) या महाराष्ट्रीय खेळाडूंकडून ही पदकाची अपेक्षा आहेत आणि ते त्या सार्थ ठरवतील असा विश्वास विचारे यांनी व्यक्त केला. 

अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत होत असलेले हे ऑलिम्पिक मानवी जिद्दीचा विजय आहे. पदक कोणाच्याही नावे असले तरी कोरोना काळात सरकारने खेळाडूंना दिलेला पाठिंबा, त्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी केलेल्या उपाययोजना याचे प्रतिबिंब नक्कीच दिसून येईल, असा आशावाद चव्हाण यांनी व्यक्त केला.

पत्र सूचना कार्यालय,मुंबई येथील  सोनल तुपे यांनी वेबिनारच्या संवादकची भूमिका बजावली.  प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांची निर्मिती असलेल्या क्योटो ऑलिम्पिक  स्फूर्तीगीताने या वेबिनारची सांगता झाली. 

Previous articleOlympics Webinar explores Opportunities and Challenges for Indian Players
Next article” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.