Home महाराष्ट्र शिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा...

शिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा

570

सैय्यद तौसीफ

शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत महाराष्ट्र कांग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व जालना चे आमदार मा.कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात मंत्रालयात राज्याच्या शिक्षणमंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य प्रवक्ता व जालना जिल्हा अध्यक्ष जावेद खान यांनी शिक्षणसेवकांच्या मानधनाविषयी निवेदन सादर केले.

राज्यात खराब आर्थिक परिस्थितीचे कारण देवून वर्ष 2000 पासून शिक्षकांची मानधनावर नियुक्ती करण्याबाबत शिक्षण सेवक योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत सुरुवातीची 3 वर्षे प्राथमिक शिक्षण सेवक-3000/- माध्यमिक शिक्षण सेवक-4000/- रुपये व उच्च माध्यमिक शिक्षण सेवक-5000/- रुपये या प्रमाणे मासिक मानधन ठरविण्यात आले होते. जेंव्हा नियमित शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागला तेंव्हा ह्या शिक्षण सेवकांच्या मानधनात सुद्धा वाढ करण्याबाबत विचार झाला व दि.01.01.2012 पासून शिक्षणसेवाकांच्या मानधनात वाढ करून प्राथमिक शिक्षण सेवक-6000/- रुपये, माध्यमिक शिक्षण सेवक- 8000/- रुपये व उच्च माध्यमिक शिक्षण सेवक- 9000/- रुपये याप्रमाणे मासिक मानधन ठरविण्यात आले. या नंतर राज्यातील नियमित शिक्षकांना वर्ष 2016 पासून सातवे वेतन आयोग लागू करण्यात आले मात्र शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. गेल्या 10 वर्षात महागाई च्या प्रमाणात शिक्षणसेवकांचे मानधन वाढलेले नाही. नियमित शिक्षकांना वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता व एक वेळा वार्षिक वेतनवाढ देण्यात येते मात्र शिक्षण सेवकांच्या ठराविक मानधनात दरवर्षी किमान एकदा तरी महागाईच्या तुलनेत वाढ करणे आवश्यक असतांना आपल्या राज्यात असे होत नाही, ही अत्यंत गंभीर व शिक्षण सेवकांवर अन्याय करणारी बाब आहे. तरी आपणास विनंती की ही अन्यायकारक शिक्षण सेवक योजना रद्द करण्यात यावी व शिक्षकांची नियुक्ती नियमित वेतानावरच करावी, किंवा 20 वर्षानंतर आज सुध्दा राज्याची आर्थिक परिस्थिती शिक्षणावर योग्य खर्च करण्यासाठी अनुकूल नसेल तर किमान शिक्षण सेवकांच्या मानधनात तरी वाढ करावी. शिक्षण सेवक योजना बंद करणे शक्य नसल्यास  प्राथमिक शिक्षण सेवक- 18000/- माध्यमिक शिक्षण सेवक- 24000/- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक- 30000/- या प्रमाणे शिक्षण सेवकांच्या मानधनात दि. 01/01/2016 पासून वाढ करावी व ही वाढ करतांना या पुढे  दरवर्षी शिक्षण सेवकांच्या मानधनात प्राथमिक- 2000/- रुपये, माध्यमिक- 3000/- रुपये व उच्च माध्यमिक- 4000/- या प्रमाणे वार्षिक मानधनवाढ करण्याबाबत तसेच नियमित शिक्षकांना वेतन आयोग लागू करतांना वेतन आयोगातच शिक्षण सेवकांच्या मानधनात सुद्धा वाढ कारण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष मुहम्मद हनीफ व राज्य सचिव शेख ज़मीर रज़ा यांनी केली.