Home सातारा पत्रकार आणि संपादक यांच्या खांद्यावर बसलेले खोडकर बाळ म्हणजे नियतकालिकाचा अंक- डॉ.सायजीराजे...

पत्रकार आणि संपादक यांच्या खांद्यावर बसलेले खोडकर बाळ म्हणजे नियतकालिकाचा अंक- डॉ.सायजीराजे मोकाशी

291

मायणी, दि. 14 (प्रतिनिधी.) :-  “पत्रकार आणि संपादक यांच्या खांद्यावर बसलेले खोडकर बाळ म्हणजे नियतकालिकाचा अंक होय. पत्रकारिता जितकी सकस, समृद्ध व सामाजिक भान जोपासणारी तितका नियतकालिकांचा अंक दर्जेदार बनतो. ‘अमृतवेल’ने कोरोना काळात सामाजिक बांधिलकीने कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा यथोचित सन्मान आपल्या अंकात केला आहे. त्यामुळे आमच्या शैक्षणिक संकुलात या अंकाचे प्रकाशन करताना अभिमान वाटतो. या अंकाने मायणी परिसरात कार्यरत असलेल्या उत्तमराव सपकाळ फाउंडेशनचा उचित गौरव केला आहे,” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी केले. ते येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या अमृतवेल मीडिया दशकपूर्ती समारंभानिमित्त ‘वसा समाजसेवे’चा विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. 

        यावेळी दीपक पवार, देवकुमार दुपटे, स्वप्नील कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पत्रकार दत्ता कोळी व पत्रकार सतीश डोंगरे यांचा वाढदिवसानिमित्त मायेची शाल व ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. 

      यावेळी बोलताना सहसंपादक दीपक पवार म्हणाले, “कोरोना महामारीने निर्माण केलेल्या आर्थिक संकटात मुद्रित माध्यमांना मोठी झळ बसली आहे. परंतु प्रतिकूल काळात जनतेचे मनोधैर्य वाढविण्याचा संकल्प करून आज नियतकालिके सुरू आहेत. चित्रकार सचिन खरात सारखे कलावंत आणि विविध सेवाभावी संस्था यांना पाठबळ व प्रसिद्धी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. प्रसारमाध्यमांनी सामुदायिक सद्भावना जोपासण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे.” 

      आभार प्रदर्शन उत्तमराव सपकाळ फाऊंडेशनचे सचिव मिलिंद देशमुखे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज डोंगरदिवे यांनी केले.

फोटो ओळी- “वसा समाजसेवेचा”या विशेषांकाचे प्रकाशन करताना प्राचार्य डॉ मोकाशी,संपादक दीपक पवार,डॉ.मिरजकर व अन्य…फोटो- मिलिंद देशमुखे