Home विदर्भ बेलोरा येथील अकरा शेतकऱ्यांचे 260 टन टरबूज खरबूज फळांचे नुकसान

बेलोरा येथील अकरा शेतकऱ्यांचे 260 टन टरबूज खरबूज फळांचे नुकसान

93
0

सोळा लाखांचे आर्थिक नुकसान


रविन्द्र साखरे। आष्टी(शहीद):-

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने कडेकोट लॉकडाऊन सुरू केले आहे. या लॉकडाऊन मुळे सर्व उलाढाल ठप्प झाली आहे. याचा फटका शेतमाल उत्पादकांना बसला आहे. बेलोरा(बुजरूक) येथील अकरा शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज या फळ पिकाचे उत्पादन घेतले होते. मात्र बाजारपेठा बंद झाल्याने व विक्रीची परवानगी नसल्याने 260 टन फळ खराब झाले आहे. यामध्ये एकूण सोळा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी साठवलेले फळ खराब होत असल्याने जनावरांना खाऊ घातले आहे. त्यामुळे वर्षभर परिश्रम घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा चुराडा झाला आहे. शासनाने याची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

बेलोरा(बुजरूक) येथील शेतकरी हुकुम जाणे, उमेश अरुण जाणे, उमेश दयाराम जाणे, वीरेंद्र जाणे, गजानन जाणे, अशोक बोरवार, मनोहर गडलींग, नकुल जाणे, अजय जाणे, सुरेश जाणे, रमेश जाणे या अकरा शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज या फळांची लागवड केली होती. त्यांना भरघोस उत्पादन मिळाले. यामध्ये टरबूज दोनशे पाच टन, तर खरबूज 55 टन एवढ्या मोठ्या क्षमतेने उत्पादन झाले. या उत्पादनाची विल्हेवाट लावण्यासाठी दरवर्षीप्रमाणे मार्केट उपलब्ध झाले नाही. शासनाने लावलेले लॉकडाउन आणि वर्धा जिल्ह्यामधील दिनांक 8 तारखेपासूनचे कडक लॉकडाऊन याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या मालाची विल्हेवाट लावायची कशी या विवंचनेत शेतकरी पार हादरून गेले.

आष्टी,आर्वी,कारंजा हे तिन्ही तालुक्याचे ठिकाण कडेकोट बंद असल्याने शेतमाल विक्रीसाठी काहीही पर्याय उपलब्ध नाही. शेवटी पाणावलेल्या डोळ्यांनी या सर्व शेतकऱ्यांनी दररोज जनावरांना फळं खाऊ घातली. आणखी भरपूर साठा सडलेला आहे. त्याची विल्हेवाट लावण्याचे काम दररोज सुरू आहे. या प्रकरणी सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी मिळण्याची मागणी केली होती. मात्र आदेश कडेकोट असल्यामुळे यावर काहीही उपाय योजना निघाल्या नाही. काल उपविभागीय महसूल अधिकारी आर्वी हरीश धार्मिक यांनी घरपोच डिलेवारी साठी परवानगी दिली. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांच्या हातून चांगला माल निघुन गेला.

आता सडका माल कोण घेणार? असा एकच प्रश्न सर्व शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे 16 लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले. उसनवारी आणि कर्ज घेऊन त्यांनी फळपिकाचे उत्पादन घेतले. मात्र या वर्षी त्यांना आपला माल सुद्धा विकता आला नाही. एवढे भीषण वास्तव या कोरोनामुळे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांसाठी जिल्हा कृषी अधीक्षक वर्धा व आत्मा प्रकल्प संचालक वर्धा यांनी कुठल्याही उपायोजना केल्या नाही. घरपोच डिलेवरी करीता द्यावयाच्या पासेस आधीपासूनच अंमलबजावणीसाठी नियोजन केले असते तर शेतकऱ्यावर ही वेळ आली नसती. अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे. एवढ्या खडक लॉकडाऊन मध्ये टरबूज व खरबूज घरपोच डिलिव्हरी करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना फळ खाऊ घालने दररोज सुरू ठेवले आहे.

आज सकाळी बेलोरा(बुजरूक) येथे सदर प्रतिनिधीने भेट दिली असता शेतकरी जनावरांना फळ खाऊ घालत होते आणि पाणावलेल्या डोळ्यांनी परिस्थितीचे वर्णन करीत होते. त्यामुळे वातावरण सुन्न झाले होते. शेतकऱ्यांसाठी शासनाने मागील वर्षी प्रमाणे सोयीसुविधा करायला पाहिजे होत्या. मागील वर्षी कोरोना लॉकडाऊन होते मात्र शेतकऱ्यांना बऱ्याच सुविधा दिल्या होत्या. मात्र या वर्षी जिल्हाधिकार्‍यांनी कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या नाही आणि शेतकऱ्यांचा विचार सुद्धा केला नाही. त्यामुळे प्रचंड नुकसानीचा सामना सहन करावा लागला हे भीषण वास्तव उघड उघड दिसत आहे.

शेतकऱ्यांनी हा सर्व दोष प्रशासनाचा असून आम्हाला तातडीने सडलेल्या मालाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा आम्ही कशाच्या भरोशावर जगावे असा प्रश्‍न केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री, कृषीमंत्री, विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदन पाठविले आहे.