Home मराठवाडा अग्रसेन भवनमध्ये ११० खाटांच्या कोविड केअर सेंटरची उभारणी, आरोग्य मंत्री राजेश टोपे...

अग्रसेन भवनमध्ये ११० खाटांच्या कोविड केअर सेंटरची उभारणी, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उदघाटन

118

 

जालना- लक्ष्मण बिलोरे

– जालना शहरामध्ये असलेल्या अग्रसेन भवन येथे सुसज्ज व सर्व सोईनीयुक्त अशा ११० खाटांच्या कोविड केअर सेन्टरचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज दि. २५ एप्रिल रोजी फीत कापून करण्यात आला.


यावेळी आमदार कैलास गोरंट्याल , विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर , जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे , अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , पोलीस उपाधिक्षक सुधिर खिरडकर , जिल्हा शल्यचित्किसक डाॅ. अर्चना भोसले, डाॅ. संजय जगताप , डाॅ. सर्वेश पाटील , मेटरन श्रीमती ज्योती बुरमुदे, महाराजा अग्रेसन फाॅऊडेशनचे डाॅ.रामलाल अग्रवाल, बी. आर जिंदल, सतीष तौरावाला,अरूण अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, कोविड बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता खाटांची संख्या वाढीवण्यावर भर देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने जालना येथील अग्रसेन भवन या ठिकाणी सुसज्ज व सर्व सोईनी युक्त ११० खाटांची संख्या असलेले कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोविड बधितांना या ठिकाणी ठेवण्यात येणार असून पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ, औषधी तसेच ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती तसेच आमदार निधीतून हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून या सेंटरच्या उभारणीसाठी मदत केलेल्या सर्वांचे पालकमंत्र्यांनी आभारही व्यक्त केले.
लिक्विड ऑक्सिजनवर अवलंबुन न राहता रुग्णांना पुरेशा प्रमाणात व योग्य दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून घेणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ८० लक्ष रुपये खर्चून प्लॅन्टची येत्या १५दिवसामध्ये या ठिकाणी उभारणी करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
रेमेडिसेंविर, ऑक्सिजन तसेच ऑक्सिजन कॉन्सट्रेटरसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन ग्लोबल टेंडर काढण्याची प्रक्रिया वित्त विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत पूर्ण करण्यात येत असून या माध्यमातून राज्याला रेमेडिसेंविर, ऑक्सिजन तसेच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मिळाल्यास मोठा आधार मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री राजेश टोपे यांनी अग्रसेन भवनमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची प्रत्यक्ष पाहणी करून सोई-सुविधांची पाहणीही त्यांनी यावेळी केली.