Home महत्वाची बातमी राजकारणातील नकली चेहरे होणार अस्तंगत ,  “कोविड महामारी नंतरचे चित्र”

राजकारणातील नकली चेहरे होणार अस्तंगत ,  “कोविड महामारी नंतरचे चित्र”

1238
मागील एक वर्ष अखंड सुरू असलेली कोविड महामारी आजतागायत सुरूच आहे. याचि देही याचि डोळा लोक आपल्या कुटुंबातील माणसांना गमावत आहेत. रोजी रोटी घरात आणणारे लोक कोरोनाच्या महामारीत कायमचे निघुन गेले.घरातली भूक बाहेर आली. नोकरीसाठी वणवण भटकंती करणारे अनेक लोक दोन वेळच्या अन्न पाण्याला महाग झाले.कुटूंब कबिला सांभाळणे अनेकांना महाग झाले. एकीकडे कोरोनाचे हे संकट सामान्य माणसाच्या थेट श्वासावर आघात करू लागलं पहिल्या लाटेत जे सहीसलामत वाचले ते दुसऱ्या लाटेत तग धरू शकले नाहीत.घरच्या लोकांच्या पार्थिवावर रांगेत नंबर लावून अंत्यसंस्कार करण्याची वेळ इथल्या महाराष्ट्राने पाहिली, आणि देशानेही पाहिली.काळाच्याही काळजाला पाझर फुटावा, असे भयावह चित्र रोज नवे रूप घेऊन दारात उभे राहत असताना, जीवाचा आकांत, वेदना, आक्रोश , बायका मुलांच्या गगनभेदी किंकाळ्यानी महाराष्ट्राचा आसमंत हादरला.नाशिकच्या झाकीर रुग्णालयात 24 निष्पाप लोकांचा बळी, मुंबईच्या विरार रुग्णालयात 14 लोकांचा बळीं आणि रोजच ऑक्सिजन अभावी व रुग्णालयात बेड मिळत नसल्याअभावी अनेकांना मृत्यू हे भयावह चित्र चारशे वर्ष जुन्या कोणत्याही महामारिपेक्षा भयंकर आहे, असे म्हंटल्यास ते वावगे ठरणार नाही. मृत्यूचा हा कहर एकीकडे सुरू असताना दुसरीकडे गलिच्छ राजकारण करणारे निर्लज्ज पुढारी समोर येत होते. एरवी सभा संमेलनातुन आपली तथाकथित जनसेवा दाखवताना ज्यांच्या थोबाडाला फेस येतो असे उरबडवे राजकारणी रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार करताना खुलेआम पकडले गेले आहेत. ज्यांच्या नावावर अधिकृतरित्या कोटीच्या कोटी संपत्ती आहे, असे लक्ष्मीपुत्र राजकारणी कुठे गेले? काही बोटावर मोजण्याइतके राजकारणी सोडले तर बाकीच्या करोड रुपयात लोळणाऱ्या व सो कॉल्ड मोठ्या तालेवार घरातील आमके -तमके कुळी मुळी, घरंदाज, उज्ज्वल परंपरा सांभाळून देश सेवा करणारे गेले कुठं ? पुण्यात कुणी सेवाभावी संस्था म्हणे कोरोनाच्या रुग्णांना जेवण देते, नाशिकला कुणी म्हणे सेवाभावी संस्था जे डॉक्टर लोकांना लुटत आहेत, त्याच्यावर नजर ठेवून आहे, त्यासाठी त्यांनी एक टीम तयार केली. आणि दुसरीकडे कोण रिक्षावाला मोफत सेवा देतोय, कोरोना रुग्णांना पोहोचवतोय दवाखान्यापर्यंत तर कुणी बेवारशी मृत देहांना भडाग्नि देण्याचे काम करतोय .सांगण्याचे तात्पर्य हे की या स्वयंसेवकापैकीं कुणीही राजकारणाशी संबधीत नाही आणि यात नाही कोणत्या राजकारण करणाऱ्या भाईंचे ना कुणा समाजभूषण पुरस्कार मिळालेल्या ( विकत घेतलेल्या ? ) बॅनरछाप समाजसेवकाचे कुणी माणसं .सगळी बिचारी कुणाकडे तरी नोकरी करणारी , कुणाकडे तरी जेमतेम पगारावर काम करणारी अशी साधी माणसं होती.एकाही भामट्या राजकारण्यांचा वंशज या ठिकाणी राबतात दिसला नाही. दिसले ते सर्व गरीब आणी भाकरीशी ज्यांचा लढा आहे, ते लोक.एक एका मतदार संघात किती डॉक्टर आहे, किती लोक ओबीसी आहेत, किती मागास वर्गीय आहे, किती दारिद्र्य रेषेखालील आहे, आणि एवढेच नव्हे कोणाकडे किती जमीनजुमला किती बँक बॅलन्स आहे इथपासून तर कोणाचे लग्न अजून बाकी आहे इथपर्यंत खडानखडा माहिती ठेवणारे मतदानाच्या आदल्या दिवशी सर्वांच्या पायावर नम्रपणे मस्तक ठेवणारे लोकप्रतिनिधी व त्यांचे पोरे कुणी ऑक्सिजन टॅंक किंवा सिलेंडर मागतांना दिसले का ? अहो ऑक्सिजन लोकांसाठी नाही, स्वतः त्यांच्यासाठी .कारण ते कधीच कोणत्या डॉक्टरची शिकार होत नाहीत.असो.आता राहता राहिला लुटारू डॉक्टर लोकांचा प्रश्न जे मिळतील त्यांना कापून घेणे, व खिसा फाटेस्तोवर पैसे लुबाडने हा गोरखधंदा अनेक डॉक्टर करत आहेत. अर्थात कांही सेवाभावी डॉक्टर आणि काही सेवाभावी राजकारणी प्रमाणिक सेवा देत आहेत, प्रामाणिक नर्स सेवा देत आहेत. या लेखात जो उल्लेख केला आहे तो अशा लोकांचा आहे त्यांचा गलिच्छपणा माध्यमांसमोर आला आहे मग ते राजकारणी असो वा डॉक्टर असो. लोकांच्या आरोग्याची दिवसरात्र काळजी घेणारे लोक कोविड काळात घसा फुटेपर्यत आपल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. पंढरपूरच्या भोळ्या वारकऱ्यांच्या वाऱ्या बंद, आणि त्याच गावात विना मास्क प्रचार सभा, मीटिंगा सुरू आहेत. त्यातच आपल्या देशभक्त व पुढाऱ्यांच्या दावणीला बांधलेल्या वृत्त वाहिन्या पंढरपूरच्या सभेबाबत व तिथल्या गर्दीने वाढलेल्या कोरोनाची जबाबदारी कोण घेणार ? असा साधा प्रश्न सभा घेणाऱ्या पुढार्यांना विचारू नये ? असो, असे अनेक निर्लज्ज चेहरे या महामारीत समोर आले आहेत. त्यांचे पाय आज जरी जमिनीवर नसले तर त्यांचे नकली व बेगडी चेहरे भविष्यात टिकणार नाहीत, आपल्या बेजबाबदार पणाची उत्तरे त्यांना द्यावी लागणार आहेत हे मात्र नक्की
आपला – 
प्रा.अमर ठोंबरे , पत्रकार संरक्षण समिती, ( नाशिक जिल्हा समन्वयक ) इमेल- amarmthombare@gmail. com