Home विदर्भ नियम मोडून अडेगावात धूमधडाक्यात स्वागत समारंभ वरासहित “चार लोकांवर गुन्हे दाखल”

नियम मोडून अडेगावात धूमधडाक्यात स्वागत समारंभ वरासहित “चार लोकांवर गुन्हे दाखल”

635

झरी जामणी तालुक्यातील पहिली कारवाई..!

यवतमाळ / मुकूटबन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न‌ समारंभ व इतर कार्यक्रम अतिशय मर्यादित स्वरुपात करण्याचे शासनाचे निर्देश असतानाही अडेगावात धूमधडाक्यात स्वागतसमारंभ (रिसेप्शन) पार पडत असताना याविरोधात मुकूटबन पोलिसांनी कारवाई करत वरासहित चार लोकांवर अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. झरी जामणी तालुक्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचं समजतं.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केवळ 25 जणांच्या उपस्थितीच लग्न व इतर सोहळे उरकावे लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांचे बळी जात असताना शासन निर्णयाचे काटेकोर पालन करीत धूमधडाक्यात विवाह समारंभ तसेच अन्य कार्यक्रम टाळणे अपेक्षित आहे. मात्र परवानगी न काढता शासन निर्णय पायदळी तुडवत धूमधडाक्यात स्वागतसमारंभ करणे अडेगावातील वराला चांगलेच महागात पडले आहे. या समारंभ ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी दंड वसुली करीता गेला असता त्याच्या सोबत हुज्जत घालून व शिवागिळ करून हाकलून लावले त्यावरून सरपंच यांनी फोन करून ही माहिती मुकूटबन पोलीस ठाण्याला दिली. त्यावरून मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक युवराज राठोड, जितेश पानघाटे, मोहन कुळमेथे, खुशाल सुरपाम व इतर कर्मचाऱ्यांनी छापा मारला असता 300 ते 400 जण गर्दी करुन असल्याचं दिसून आलं. यानंतर पोलिसांनी कारवाई करत नवरदेव मंगेश श्रीराम चींचुलकर, श्रीराम चींचुलकर, वैभव चींचुलकर, विशाल चींचुलकर व शंकर दादाजी झाडे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी यापुढेही शासन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करणार असल्याचा इशारा मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी दिला आहे.