Home मुंबई निष्पक्ष चौकशीसाठी हे सरकार बरखास्त करावे, विरोधकांची भूमिका बोटचेपी – ॲड. प्रकाश...

निष्पक्ष चौकशीसाठी हे सरकार बरखास्त करावे, विरोधकांची भूमिका बोटचेपी – ॲड. प्रकाश आंबेडकर

755

मुंबई, दि. २२ – मुख्यमंत्र्यांना कणा नसल्याचे हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले असून संजय राऊत यांनी वाचून बोलावे लिहून बोलू नये,

त्याचबरोबर देशमुख प्रकरणात राज्यपालांनी आपला अहवाल राष्ट्रपतींना पाठवला नाही तर मी असे समजेल की राज्यपाल ज्या पक्षाचे आहेत तो पक्ष ही या प्रकरणात सामील आहे, असे गंभीर वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांच्या झालेल्या भेटीत आज केली.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज दुपारी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मनसुख हिरेन प्रकरण असो वा देशमुख प्रकरण याची निष्पक्ष चौकशी राज्य सरकारकडून होणार नाही, त्यासाठी हे सरकार बरखास्त करण्यात यावे, मात्र सभागृह बरखास्त करू नये, अशी प्रमुख मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यात हाय प्रोफाईल लोकांचे मृत्यू झाले असून या सर्व आत्महत्या दाखवण्यात आल्या आहेत. या मृत्यू प्रकरणातही योग्य ती चौकशी झाली नाही, असे असतानाच वाझे प्रकरण बाहेर आले. या प्रकरणातही कोट्यवधी रुपये वसुलीचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला. आरोप करणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर असून कोट्यावधी रुपये वसूल करण्याचा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला आहे की कॅबिनेट स्तरावर याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यासाठी हे सरकार बरखास्त करण्यात यावे, याबाबत राज्यपालांनी आपला अहवाल पाठवावा अन्यथा आम्ही असे समजू की राज्यपाल ज्या पक्षाचे आहेत त्यांचेही लोक यामध्ये सामील आहेत.

परमबीर यांच्या पत्रावरून हे निश्चित झाले आहे की राजकारणातील क्रिमिनल एलिमेंट व पोलीस खात्यातील क्रिमिनल एलिमेंट एकत्र आल्यावर काय घडू शकते. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या प्रमुखांनी सचिन वाझे यांचा जबाब सार्वजनिक करावा, त्यामुळे राजकारणात गुन्हेगार किती झाले आहे याची माहिती लोकांना मिळेल व ते योग्य निर्णय घेतील. हे वसुलीचे राज्य असून ही वसुली थांबली नाही तर खालच्या स्तरावर ही वसुली चालू होईल असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला. या सर्व प्रकरणात भाजपा बोटचेपी भूमिका का घेत आहे हा मुद्दा ही त्यांनी यावेळी मांडला.

वाझे वसुली प्रकरणात देशमुख एकटेच आहेत का तेच एकटे दोषी आहेत का या प्रकरणात कॅबिनेट गुंतली आहे का हे ज्या दिवशी ते मान्य करतील तेव्हा मोठा बॉम्बस्फोट होईल हे आपल्याला माहीत असल्याचे ही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तू माझी पाठ खाजवू नको मी तुझी पाठ खाजविणार नाही अशी भूमिका सध्या सत्ताधारी विरोधक घेत असून त्यासाठी वाझे यांचा जबाब सार्वजनिक झाल्यास सर्व प्रकरण बाहेर येईल व दूध का दूध पाणी का पाणी होईल.

यावेळी संजय राऊत यांना टोला लगावताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की मी यापूर्वी ही राऊतांना सल्ला दिला आहे की लिहून बोलत जाऊ नका वाचून बोलत जा. ३५६ वर बाबासाहेब काय म्हणाले ते कधी वापरावे, याचा खुलासा बाबासाहेबांनी केला आहे. राऊत यांनी आता राजकारणातील गुन्हेगारी बद्दल बोलावे. मागे हे मी सांगितले होते की मुख्यमंत्र्यांनी कणा दाखवावा. मात्र त्यांच्याकडे कणा नाही हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले असल्याचेही प्रकाश आंबेडकर शेवटी म्हणाले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.