Home मराठवाडा जालना जिल्ह्यातील हाॅटेल,बार, रेस्टॉरंट ३१ मार्चपर्यंत बंद – जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे...

जालना जिल्ह्यातील हाॅटेल,बार, रेस्टॉरंट ३१ मार्चपर्यंत बंद – जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे आदेश

636

लक्ष्मण बिलोरे

जालना शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर टाकण्यात आला आहे. मात्र चहाच्या टपऱ्या,हॉटेल,पानटपरी,भेळ व रगडा गाड्या यासह ज्या ठिकाणी मास्क काढावे लागतात असे सर्व व्यवसाय आज सोमवारी मध्यरात्री पासून पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येत्या गुरुवारी जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात काय निर्णय घेतला जाईल याकडे जिल्हा वासीयांचे लक्ष लागून आहे.कोरोनाचा कहर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उचलले पाऊल
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज कडक पाऊलं उचलली आहेत. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने ३१मार्चपर्यंत नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रात काही निर्बंध लादले आहेत.मात्र त्यानंतरही रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री रविंद्र बिनवडे यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पुन्हा काही नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व हॉटेल,ढाबे, खानावळ,चहाची हॉटेल,बार रेस्टॉरंट, भेळ व पाणीपुरी गाडे,नाष्टा सेंटर,गाडे,रसवंतीगृह,ज्यूस सेंटर, चायनीज सेंटर,पावभाजी सेंटर,पान टपऱ्या पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी दिले आहेत.हे आदेश आज सोमवारी मध्यरात्रीपासून येत्या ३१ मार्च पर्यंत लागू राहील असेही बिनवडे यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.