Home विदर्भ राष्ट्रवादी महिला काँग्रेस यवतमाळच्या वतीने‌ मोदी सरकार विरोधात चूल मांडा आंदोलनातून संताप…!

राष्ट्रवादी महिला काँग्रेस यवतमाळच्या वतीने‌ मोदी सरकार विरोधात चूल मांडा आंदोलनातून संताप…!

332
यवतमाळ – गॅसची वाढ दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे, फेब्रुवारी महिन्यातच सलग ३ वेळा ही वाढ झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, गृहिणींना संसाराचा गाडा चालवणे अवघड झाले आहे, मोदींच्या केंद्र सरकारला अजिबात जनतेविषयी सहानुभूती नाही.
त्यामुळे अखेर चूल मांडा आंदोलनाशिवाय आणि चूल मांडण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यातच भर म्हणजे पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी हिवाळ्यामुळे ही वाढ झाल्याचा अजब दावा केला आहे, त्यामुळे संतापाची अधिकच भर पडली आहे, त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महिलांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आज दारवा रोडवरील पेट्रोल पंपावर महिला जिल्हाध्यक्ष एडवोकेट क्रांती धोटे राऊत यांच्या उपस्थितीत मोदींच्या पेट्रोलपंपावरील बॅनरखाली चूल मांडा आंदोलन करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. या महिन्यात सर्वप्रथम ४ फेब्रुवारी २०२१ रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा ५० रुपयांची वाढ करण्यात आली. मग आता तिसऱ्यांदा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. नव्या दरवाढीमुळे आता १४.२ किलोग्रॅम एलपीजी गॅस खरेदीसाठी ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागणार आहेत जे ३ फेब्रुवारी रोजी ७९४ रुपये इतके होते. मुंबईत एलपीजी गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना ७९४ रुपये मोजावे लागणार आहेत.
तीन महिन्यांत २०० रुपयांची वाढ
गेल्या तीन महिन्यांत एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २०० रुपयांनी वाढ झाली आहे. १ डिसेंबर रोजी गॅस सिलिंडरचा भाव ५९४ रुपयांवरुन ६४४ रुपये इतका झाला होता. १ जानेवारी रोजी पुन्हा ५० रुपयांची वाढ झाली यामुळे ६४४ रुपयांवरुन सिलिंडरचा दर ६९४ रुपये इतका झाला. ४ फेब्रुवारी रोजी पुन्हा वाढ झाल्याने हा भाव ७१९ रुपये इतका झाला. १५ फेब्रुवारी रोजी पुन्हा दरवाढ होऊन ७१९ रुपयांवरुन ७६९ रुपये इतका झाला. त्यानंतर आज पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली आहे.
ही वाढ संतापजनक असून केंद्र सरकारला आता सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, त्यांना महागाई कमी करणे जमत नसेल तर त्यांनी खूर्च्या खाली कराव्यात, जनतेची लुबाडणूक करू नये, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, चूल मांडा आंदोलनात महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला असून हा उद्रेक दिल्लीपर्यंत पोहचवून केंद्र सरकारला धडा शिकल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष एडवोकेट क्रांती धोटे राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी गौरी उजवणे , नयंती वैद्य, वर्षा आखरे ,वंदना मोहितकर, कविता गोले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होत्या.