Home विदर्भ यवतमाळ दिवाणी न्यायालयाच्या प्रकरणाला उच्च न्यायालयाची स्थगिती

यवतमाळ दिवाणी न्यायालयाच्या प्रकरणाला उच्च न्यायालयाची स्थगिती

119
0

कुर्ली ग्रामपंचायतची 1 लाख 87 हजार 909 रुपये थकबाकी कर वसुल करण्याची मागणी….!


अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा ले- आउट मुखत्यारपत्र धारक जयप्रकाश आशारेड्डी काटपेल्लीवार यांनी मागील काही वर्षा पासुन कुर्ली ग्रामपंचायतीचे 1 लाख 87 हजार 909 रुपये कराची थकबाकी भरलेली नसल्याने त्यांचे कडुन थकबाकी असलेले कर तात्काळ वसुल करण्यात यावे, अशी मागणी कुर्ली येथील गावकर्‍यांनी शासनाकडे केली आहे. दरम्यान, या बाबत कुर्ली ग्रामपंचायतीने काटपेल्लीवार यांना यापूर्वीच नोटीस बजावली होती, हे विशेष. तक्रारीच्या प्रती पंचायतराज समिती प्रमुख तथा आमदार संजय रायमुलकर, अमरावतीचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आदींकडे रजिष्टर पोष्टाने व ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहे.
▪️शासनाच्या निर्णयानुसार, राज्यातील ग्रामपंचायतीची कर वा थकबाकी असलेले कर हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे नियम 124 अन्वये कराचा भरणा करणे आवश्यक आहे. परंतु; कुर्ली येथील जयप्रकाश काटपेल्लीवार यांनी अद्यापही ले आउटचे हस्तांतरण व ग्रामपंचायत कराचा भरणा कुर्ली ग्रामपंचायतीला केलेला नाही. त्यामुळे त्यांचे विरुद्ध थकबाकी वसुल करुन फौजदारी कारवाई करण्यात यावे, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.
▪️सदर प्रकरणात तहसीलदार घाटंजी यांनी कुर्ली ग्रामपंचायतीचे थकबाकी कर तात्काळ भरण्याचे निर्देश काटपेल्लीवार यांना 13 जुन 2016 रोजी दिले होते. मात्र, काटपेल्लीवार यांनी केळापूर येथील उप विभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात तात्पुरती स्थगिती मिळण्यासाठी अपील दाखल केले. परंतु; न्यायालयाने 27 फेब्रुवारी 2017 रोजी तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर केळापूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी यांचे न्यायालयाने पुन्हा 5 एप्रिल 2017 रोजी सदरचे अपील फेटाळून लावले.
तदनंतर काटपेल्लीवार यांनी अपर जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात अपील दाखल केले. मात्र, तेथे सुध्दा 25 एप्रिल 2017 रोजी अपील फेटाळण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार यांचे अपील फेटाळण्याने त्यांनी पुन्हा यवतमाळच्या दिवाणी न्यायालयात (वरिष्ठ स्तर) स्थगितीसाठी अपील दाखल केले. परंतु; सदर प्रकरण यवतमाळच्या दिवाणी न्यायालयात चालु शकत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनिष पितळे यांनी 27 नोव्हेंबर 2019 रोजी स्थगिती दिली. मात्र, जयप्रकाश काटपेल्लीवार यांनी अद्यापही कुर्ली ग्रामपंचायतचे थकबाकी कर भरले नसल्याने त्यांचे कडुन तात्काळ थकबाकी कर वसुली करण्याची मागणी गावकर्‍यांनी शासनाकडे केली आहे.