Home महाराष्ट्र लेखास्त्र : ६  ,  “जन-गण-मन : लोकशाहीचे सौंदर्य”

लेखास्त्र : ६  ,  “जन-गण-मन : लोकशाहीचे सौंदर्य”

264

 

‘जन-गण-मन’ हे भारताचे राष्ट्रगीत लोकशाहीचे सौंदर्यवर्धक तत्वज्ञानही आहे, असे म्हणायला हरकत नही. इंग्रज युवराजाच्या स्वागतासाठी लिहिले गेलेले गीत, या वादापलीकडे जाऊन आपण ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत म्हणून पारिध होण्यासाठी घटनापीठासमोर झालेल्या युक्तिवादाच्या इतिहासाचा वेध घेणे अत्यंत गरजेचे आहे.
​त्यावेळी घटनापीठासमोर ‘जन-गण-मन’, ‘वंदे मातरम’ आणि ‘सारे जहा से अच्छा’ या तीन गीतांपैकी एक गीत राष्ट्रगीत म्हणून निवडण्यासाठी युक्तिवाद चालू होता. यामधील ​‘वंदे मातरम’ हे गीत त्यातील संस्कृत अडीच हजार वर्षे शिक्षणापासून वंचित अशा ९५% जनतेला कसे समजणार यासाठी तर अय्यमा इक्बाल लिखित ‘सारे जहा से अच्छा’ गीतातील ‘हिंदुस्थान’ या शब्दाच्या वापरामुळे वाद-विवाद आणि साधक-बाधक चर्चेअंती बाद ठरले. तरीही संसद व विधानसभा अधिवेशनांच्या प्रारंभी व समारोपाला ‘वंदे मातरम’ व सैनिकी आणि पोलीस संचालनात ‘सारे जहा से अच्छा’ या दोन्ही गीतांना संविधानिक मान्यता देण्यात आली, ही आमची राजकीय समावेशकता नव्हे काय?
​आता राष्ट्रगीताच्या चुरशीत उरलेल्या ‘जन-गण-मन’ या गीताच्या शाब्दिक गर्भितार्थाने घटनापीठासमोरील युक्तिवादात उर्जा पेरली. तर ‘जन-गण-मन’ यातील ‘जन’ म्हणजे देशाचे नागरिक. अश्या जनांतील गणांच्या मनात काय आहे ? हे ओळखणे गीताकारास अभिप्रेत आहे. जनांतील गण म्हणजे १८ वर्षावरील जनता, ज्यास संविधानिक मताधिकार प्राप्त असतो. तर अशा गणांच्या मनातून म्हणजेच त्यांनी त्यांच्या बौद्धिक वं वैचारिक क्षमतेनुसार निवडलेले लोकप्रतिनिधी, हे ‘अधिनायक’ अर्थात संसदेतील खासदार व विधानभवनातील आमदार संबोधिले जातात व हेच ‘अधिनायक’ भारताचे ‘भाग्यविधाता’ ठरतात. सध्याच्या काळात खरंच यांना ‘भाग्यविधाता’ म्हणावे की नाही, या वादात न पडणे उत्तम.
​‘जन-गण-मन’ या गीताचा अर्थ घटनापीठासमोर योग्यरित्या मांडल्यानंतरच या गीताला राष्ट्रगीताचा मान मिळाला. पण या सर्वाच्या सखोल अभ्यासानंतर, लोकशाहीचे सौंदर्य कसं काळवंडलं गेलं, याची प्रचिती येते. जात, धर्म, पंथ, संप्रदायाच्या विषवल्ली भारताच्या जनांना ‘गण’ होऊच दिलं जात नाही. म्हणून लोकशाहीचा वटवृक्ष हा कोलमडण्याच्या अवस्थेत आहे. आता सुजाणपणे योग्य ती काळजी घेऊन ह्या वृक्षाला जगवायचं की त्याचं कोलमडणं उघड्या डोळ्यांनी नुसतं पाहत राहायचं हा भारताचे नागरिक म्हणून सर्वस्वी तुमचा निर्णय असेल.
जय जय जय जय हे…. भारत माता की जय !