Home माहिती व तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अभ्यासूपणे वापरावे – खासदार रामदास तडस

नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अभ्यासूपणे वापरावे – खासदार रामदास तडस

32
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

जिल्हा कृषी महोत्सव….

वर्धा , दि. १५ :- पारंपारिक शेतीमधून शेतकऱ्यांना मुबलक उत्पादन मिळत नाही. आज शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान उपलबध्द आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होणाऱ्या फायद्याचा अभ्यास करून शेतकऱयांनी त्याचा जाणीवपूर्वक अवलंब करावा आणि शेतीतील उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी जिल्हा कृषी महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगीं केले.

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे आयोजित तीन दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाचे उदघाटन आज झाले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, कृषी व पशु संवर्धन सभापती मुकेश भिसे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री इंगळे, जिल्हा परिषद विरोधी गटनेते संजय शिंदे, आत्माच्या प्रकल्प संचालक विद्या मानकर, कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे, माजी अध्यक्ष नितीन मडावी, पंकज सायंकार, विमल वरबे, केसुताई धनविज उपस्थित होत्या.

कृषी महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या कृषी सभापतींचे कौतुक करताना श्री तडस म्हणाले , भिसे यांनी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी चांगला प्रयत्न केला आहे. शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा. केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करून दिले. यासाठी खासदार निधीतून 50 लक्ष रुपये उपलब्ध करून दिल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना परदेशाप्रमाणे सबसिडी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी जिल्हा कृषी विकास परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पंजाबमध्ये रासायनिक खतांच्या अति वापरामुळे कॅन्सर रुग्णांची संख्या वाढली आहे. अशी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये यासाठी शेतकऱयांनी रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन उपाध्यक्ष वैशाली येरावार यांनी केले. शेतकऱयांनी या कृषी महोत्सवाचा उपयोग शेतीत वापरल्या जाणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी करावा. शेतीसाठी आवश्यक वस्तूंचे उत्पादन वर्धेतच झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना आणि येथील बेरोजगारांना लाभ होईल. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्रीमती येरावार यांनी केले.

जिल्हा परिषदेचा शेषफंड योग्य कामासाठी वापरला जात असल्याचे समाधान व्यक्त करीत मडावी यांनी यवतमाळ जिल्ह्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातही शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याची योजना राबवावी अशी मागणी नितीन मडावी यांनी केली.

याप्रसंगी शेतकऱ्यांना फेरोमेन ट्रॅप चे वाटप करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला टोल फ्री क्रमांक, आणि विविध माहिती पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या महोत्सवात नवनवीन यंत्रे, विविध पिकांची नवनवीन बियाणे आणि योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश भिसे यांनी केले तर आभार संजय बमनोटे यांनी मानले.

Unlimited Reseller Hosting