Home विदर्भ आभाळाच्या सारीपाटावर रंगलाय काळ्या ढगांचा डाव…!

आभाळाच्या सारीपाटावर रंगलाय काळ्या ढगांचा डाव…!

45
0

भूमिपुत्रांच्या हातावर तुरी

शेतकरी हतबल

देवानंद जाधव

यवतमाळ , (मंगरूळ) – सध्या आभाळाच्या सारीपाटावर काळ्या ढगांचा डाव रंगला आहे. आभाळात मोकाटपणे नाचणा-या आणि काळवंडून गेलेल्या ढगांनी ,शेतकरी मायबापांच्या शेतशिवारातील तुरीच्या ऊभ्या पिकाला जणु नजर लावली आहे. पोषक वातावरणा ऐवजी तुरीचे अवघे रान करपुन जात आहे. हातात आलेले पिक डोळ्या देखत मान खाली टाकत असल्याने, पंचक्रोशीतील तमाम भूमिपुत्रांचा जीव तिळतिळ तूटत आहे. शेतक-यांच्या घराघरांत सुतकी वातावरण निर्माण झाले आहे. सटवीने सा-या सृष्टीतील वेदना आणि संकटाचं गाठोडं शेतक-यांच्याच, बरगड्या उघड्या पडलेल्या ऊरावर कोरल्या की काय?अशी भावविभोर भावना शेतकरी मायबापांची झाली आहे. त्या मुळे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी शेतक-यांची अवस्था पुन्हा एकदा अर्धवट ठेचलेल्या सापासारखी झाली आहे.
यंदा कसं व्हईल त् व्होवो बाप्पा
अशी हताश आणि हतबल
मानसिकता सर्वदुर झाली आहे. कापूस विकुन कर्ज फेडण्याचे, आणि वयात आलेल्या मुली चे हात पिवळे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या शेतकर-यांच्या स्वप्नांची पुरती राख रांगोळी झाली आहे. पांढ-या सोन्याच्या हिरव्या बोंडावर गुलाबी बोंडअळी तुटुन पडल्याने, कापसाचेही पिक कुपोषित होऊन पोखरले गेले.
ऊडीद गेले, मुग गेले,
आस आता कायची?
लेकीच्या दिवाळी साठी,
बकरी विकली 
अशी काहीशी वेदनादायी अवस्था शेतक-यांच्या घराघरांत दिसते आहे. सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली येऊन काळ्या मातीत लोळणारा अन्नदाता या वर्षी अधीकच माणसिक आणि आर्थिक दृष्ट्या खचला आहे. डबडबलेल्या डोळ्यातुन बाळंत होणा-या अश्रू रत्नांमध्ये त्याचे काळीज चिरत नेणारे प्रतिबिंब दिसत आहे. पोटाला पालव बांधुन आणि हाडाची काडं, अन् रक्ताचं पाणी करुन, पोटच्या पोरागत जपलेलं सोन्या सारखं पिक यावर्षी उद्ध्वस्त झालं. पेरलं मणभर अन् झालं कणभर. त्यामुळे शेतकर्यांच्या घरातील अर्थसंकल्प कोलमडला आहे. लेकरां बाळांची आगामी सुगी पर्यंत भाकरीची सोय कशी लावायची, या मेंदुला डागण्या देणा-या विचाराने च भूमिपुत्रांची अवस्था पाण्याविना मास्यासारखी झाली आहे. त्यांच्या पाठीवर हात देऊन ऊभारी देणे गरजेचे आहे. शेतक-यांच्या जिवावर जगणा-यांनी, शेतकरी संकटात असताना, मायेच्या ममतेने मदत करणे हे आपले सामाजिक ऊत्तरदाईत्व समजावं असं वाटतयं. एकंदरीत आभाळाच्या सारीपाटावर रंगलाय काळ्या ढगांचा डाव, त्यामुळे तुरीने भूमिपुत्रांच्या हातावर ‌तुरी च दिल्याचे वास्तव आहे.