
आज पुण्यात झाली लसीची चाचणी ,
अमीन शाह
संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरस विरोधात ऑक्सफर्ड विद्यापीठाने लस विकसित केली आहे. जगातील वेगवेगळया देशांमध्ये या लसीच्या मानवी चाचण्या सुरु केल्या आहेत.
तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात असलेली ही लस आहे. सर्व काही सुरळीत झाले तर लवकरच ही लस उपलब्ध होईल. आजपासून भारतातही या लसीच्या फेज दोन आणि तीनच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. पुण्यातून या लस चाचणीला सुरुवात झाली आहे.
पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये आज दोन स्वयंसेवकांना ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस देण्यात आला. या लस चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकाने लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
तो म्हणाला की, “मला सोशल मीडियाच्या माध्यमातुन माहिती मिळाली की, लस चाचणीसाठी स्वयंसेवक पाहिजेत. त्यानंतर मी भारती रुग्णालयासोबत संपर्क साधला. त्या अगोदर मी घरच्यांशी चर्चा केली. त्यांनी देखील या कार्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले. त्या नंतर माझ्या स्वॅब आणि अँटीबॉडीज तपासणी करण्यात आली. त्या निगेटिव्ह आल्याने आज मला लस देण्यात आली आहे. मला खूप अभिमान वाटत आहे की देशाच्या कार्यात सहभागी होते आले. अनेक नागरिकांनी या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन या तरुणाने केले आहे











































