Home महाराष्ट्र नायब तहसीलदार अस्लम जमादारांचा मुलगा गणपती मुर्ती आणण्यासाठी हट्ट करतो तेव्हा..*???

नायब तहसीलदार अस्लम जमादारांचा मुलगा गणपती मुर्ती आणण्यासाठी हट्ट करतो तेव्हा..*???

167

*नायब तहसीलदार अस्लम जमादारांचा मुलगा गणपती मुर्ती आणण्यासाठी हट्ट करतो तेव्हा..*???

*सलमान मुल्ला*

कळंब , जी , उस्मानाबाद ,

काल संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात गणपती बाप्पा चे आगमन कोरोना संकटामुळे साधेपणाने झाले..
मात्र मुलं ही देवाघरची फ़ुलं अस म्हणतात याचाच प्रत्यय कल कळंबचे नायब तहसीलदार अस्लम जमादार यांना आला कारण त्यांचा मुलगा अब्रार हा गणपती बाप्पा ना घरी आणण्यासाठी हट्ट करू लागला आणि मग पुढे काय घडले वाचा अस्लम जमादार यांच्या लेखणीतून

आज दुपारी ग्रामीण भागात कामानिमित्त गस्तीवर असताना बायकोचा फोन आला. माझा मुलगा अब्रार गणपती आणायचा म्हणून हट्ट करतोय आणि खूप रडतोय अस तिचा निरोप. आधी हसू आलं ऐकून. मुसलमानांच्या घरी गणपती हा विचार माझ्या डोक्यात… मागच्या वर्षी मी, रवी, बाबळे सर सोबत आमची चिमुकली मुले बाबळे सरांचा गणपती आणायला गेले होते. यावर्षी रवी आणि बाबळे सर बदलून गेले त्यामुळे गणपती आणायला गेलो नाही. पण त्या लहान लेकराला काय कळतंय मुसलमान काय आणि गणपती काय… लहानपण देगा देवा म्हणतात ते खरंच आहे. मी तिला म्हटलं त्याला सांग मी घरी आलो की आणू गणपती. वेळ मारून नेण्यासाठी तेवढंच काय ते कारणं. मग थोड्या वेळाने बायकोने व्हाट्सएप ला फोटोच पाठवला. श्रींची मूर्ती माझ्या घरी विराजमान झालेली. प्रस्थापित मानसिकतेमुळे जे शक्य होत नाही असं वाटत होतं ते प्रामाणिक निरागसतेनं केलं. संध्याकाळी सर्वांनी सोबत बाप्पाची आरती केली. जर त्याच्या मनात आलं तर बाप्पा मुसलमानांच्या घरी सुद्धा आनंदाने येतो आणि त्याला आणल्यावर आनंद पण सोबत येतो याची आज प्रचिती झाली. अब्रार खूप खुश आहे बाप्पासोबत. आता काय ते फक्त एकच मागणं आहे बाप्पाकडं. तुला स्वीकारायची निरागसता अशीच त्याच्या मनात आयुष्यभर राहूदे. बाप होऊन जेंव्हा विचार केला तेंव्हा मुलाचा आनंद आणि बाप्पाचं माझ्या घरात येणं दोन्ही ही खूप सहजपणे स्वीकारता आलं. आयुष्यात ही सहजता अशीच कायम राहूदे रे बाप्पा.
#गणपती_बाप्पा_मोरया

अस्लम जमादार
(नायब तहसीलदार, कळंब)