August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

पालकमंत्री संजय राठोड यांच्या  निर्णयानंतर यवतमाळ , दारव्हा व नेर येथील संचारबंदीत शिथिलता….!

सोमवारपासून सकाळी 6 ते सांयकाळी 5 पर्यंत उघडी राहणार बाजारपेठ

यवतमाळ , दि. ०२ :- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथे गत दहा दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री संजय राठोड यांनी व्हीसीद्वारे या शहरातील लॉकडाऊन बाबतचा आढावा घेतला. त्यानुसार त्यांनी संचारबंदीत शिथिलता देण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाला केल्या. त्यांच्या या निर्णयामुळे आता यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथील संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे. सोमवारपासून या शहरातील बाजारपेठ सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडी राहणार आहे. या निर्णयामुळे नागरिक तसेच व्यापा-यांमध्ये समाधान आहे.

जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, पांढरकवडा, नेर, पुसद, दिग्रस शहरात व या शहरालगतच्या परिसरात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथे कमीजास्त प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असली तरी गत 10 दिवसात तुलनेने येथील रुग्ण संख्येत घट झाल्याचे निदर्शनास येते. या सर्व बाबी लक्षात घेता पालकमंत्री संजय राठोड यांनी लॉकडाउन संदर्भात आज (दि.1) व्हीसीद्वारे जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतला.

यात त्यांनी, यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथे रुग्णांची संख्या कमी होत असल्याने या शहरातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या सूचना दिल्या. मात्र पांढरकवड़ा, पुसद आणि दिग्रस येथे पॉझेटिव्ह रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता या शहरातील लॉकडाऊन पुढील सात दिवस कायम ठेवावे, असेही आदेशित केले. त्यानुसार यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथे सोमवारपासून लॉकडाऊन हटवून सकाळी 6 ते सायंकाळी 5 या वेळेत दुकाने उघडण्यास मुभा देण्यात येईल.

जिल्ह्यातील नागरिकांनी बाजारपेठ उघडी असतांना व सायंकाळी 5 नंतर कुठेही अनावश्यक गर्दी करू नये, बाहेर जातांना मास्कचा वापर करावा, आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, सोशल डिस्टनसिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आलेल्या यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथील परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवणार आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले नाही, विनाकारण गर्दी केली आणि पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली तर मग प्रशासनासमोर वरील शहरात पुन्हा लॉकडाऊन शिवाय पर्याय राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!