Home विदर्भ यवतमाळ जिल्हाधिकारी , एसपी प्रतिबंधित क्षेञात प्रत्यक्ष पाहणी…!

यवतमाळ जिल्हाधिकारी , एसपी प्रतिबंधित क्षेञात प्रत्यक्ष पाहणी…!

54
0

पांढरकवडा , जोडमोह , झरीजामणी व मारेगावचा आढावा…!!

यवतमाळ , दि. 30 :- कोरोना विषाणूचा संसर्ग शहरी भागातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाल्याने तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लगातार वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन ‘हाय अलर्ट’ वर आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्यासोबतच येथील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह खुद्द सीईओ आणि एसपींसह प्रतिबंधित क्षेत्रात दाखल झाले. यावेळी त्यांनी पांढरकवडा, जोडमोह (ता. कळंब), झरीजामणी व मारेगावाचा आढावा घेतला.

जोडमोह येथील वॉर्ड क्र. 1 आणि वॉर्ड क्र.4 चा काही भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. या क्षेत्रात एकूण 305 घरे असून लोकसंख्या 1355 आहे. तर संपूर्ण गावाची लोकसंख्या जवळपास 3500 आहे. प्रतिबंधित क्षेत्रासाठी आरोग्य विभागाच्या सात व इतर भागासाठी आठ अशा एकूण 15 पथकाद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाच्यावतीने या भागात जीवनावश्यक वस्तु, किराणा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी तालुका प्रशासनाला सुचना देतांना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह म्हणाले, पॉझेटिव्ह आलेल्या नागरिकांच्या संपर्कातील 100 टक्के लोकांचा शोध घेऊन त्यांचे नमुने त्वरीत तपासणीकरीता पाठवा. कॉटॅक्ट ट्रेसिंग हे योग्य प्रकारे झाले पाहिजे. पूर्व व्याधींनी ग्रस्त (को-मॉरबीड) असलेल्या नागरिकांचा नियमित फॉलोअप घेऊन त्यांची तपासणी करा.

पांढरकवडा येथील मशीद वॉर्डची पाहणी करतांना ते म्हणाले, मशीद वॉर्ड तसेच हनुमान वॉर्डाच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा वाढवाव्यात. प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवा. शहरातील को-मॉरबीड नागरिकांच्या तपासण्या प्राधान्याने करा. पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे नमुने तपासणीकरीता त्वरीत पाठवा. नगर परिषदेने शहरात आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेटींग करावे व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आवश्यकता असल्यास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, असे निर्देश दिले.

झरीजामणी येथील प्रतिबंधित क्षेत्रात तालुका प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात येत आहे, याचाही त्यांनी आढावा घेतला. मुकुटबन येथील एका खाजगी कंपनीत काम करणा-या कामगाराला कोरोनाची बाधा झाल्यामुळे कंपनी प्रशासनाने विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घ्यावी. याबाबत तालुका प्रशासनाने कंपनीच्या व्यवस्थापनाशी त्वरीत बैठक घेऊन त्यांना सुचना कराव्यात, असे निर्देश दिले.

प्रतिबंधित क्षेत्रातील तसेच संपर्कात आलेल्या नागरिकांनीसुध्दा कोणतीही भीती मनात न बाळगता तपासणीकरीता आपले नमुने द्यावे. अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, कुठेही गर्दी करू नये, बाहेर जातांना मास्कचा वापर करावा, हात वारंवार स्वच्छ धुवावे, कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, राळेगावचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण यांच्यासह तालुकास्तरीय यंत्रणेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting