August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

किनवट , गोकुंदा येथे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह , शिवशंकरनगर व पौर्णिमानगर परिसर कंटेनमेंट झोन जाहीर – सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल

मजहर शेख

नांदेज / किनवट , दि. ८ :- येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील दोन रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिवशंकरनगर व पौर्णिमानगर परिसर
कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जाहीर केलेल्या ब्रेक द चैन मधील बाबींचे तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
हिमायतनगरच्या कोविड केअर सेंटरमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील नऊ जणांचे स्वॅब उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा ( किनवट ) येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरच्या वतीने दि. ७ जुलै तपासणीसाठी पाठविले होते. दि. ८ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी ७ अहवाल निगेटिव्ह आले असून १८ व २० वर्षीय तरूण रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बाधित व्यक्तीच्या संपर्कातील दोन रुग्ण कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आले असल्याने उपविभाग किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर अभिनव गोयल ( भ्रा.प्र.से. ) यांनी गोकुंदा ग्रामपंचायत हद्दीतील शिवशंकरनगर व पौर्णिमानगर कंटेन्मेंट झोन म्हणुन घोषीत केला आहे . या संपुर्ण परीसरात कलम १४४ लागु करण्यात आले आहे . या हद्दीमध्ये कुणीही प्रवेश करणार नाही अथवा बाहेर जाणार नाही . तसेच येथील दुकाने पुर्णपणे बंद राहतील . तसेच उपरोक्त प्रमाणे घोषीत केलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये या रोगाचा प्रसार रोखण्यासंबंधाने तपशिलवार धोरण व करावयाच्या उपाययोजना वेळोवेळी जाहीर करण्यात आल्या असून , त्याबाबत आरोग्य विभागाने सुध्दा प्रमाणित कार्यपध्दती ( SOP ) जाहीर केलेली आहे . त्या अनुषंगाने सदर झोन मध्ये विविध उपाययोजना व नियोजन संबंधित विभागाने केल आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये पुर्णपणे संचारबंदी लागु राहील आणि सदरचे क्षेत्रात प्रवेश आणि निर्गमित करण्यास बंदी असेल , अत्यावश्यक सेवा जसे किराणा साहित्य व भाजीपाला , दवाखाना / मेडीकल यांची आवश्यकता असल्यास ग्रामपंचायत / आरोग्य यंत्रणेमार्फत त्याचा पुरवठा मागणी प्रमाणे सशुल्क करण्यात येईल , कंटेन्मेंट झोन मधील सर्व घरांचे सर्वेक्षण निर्धारीत वेळेत पुर्ण करणेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी वैद्यकीय पथक गठीत केले आहे. सदर क्षेत्राच्या चेक पोस्ट प्रवेश व निर्गमन ठिकाणावर आरोग्य विभागातील पथकाव्दारे तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणु ( कोव्हीड -१९ ) लागन रुग्णाचे संपर्कात आलेल्या सहवासित व्यक्तींचा तात्काळ शोध घेणे आणि वैद्यकीय पथकाने निर्देशाप्रमाणे गृह विलगीकरणासह, संस्थात्मक विलगीकरण करुन इतर वैद्यकीय कार्यवाही तातडीने करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांना गृह विलगीकरण केलेले आहे त्या व्यक्तींचा वैद्यकीय अहवाल येईपर्यंत नियमित पाठपुरावा करण्यात यावा.संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेव्दारे उपरोक्त परीसराची संपुर्ण स्वच्छता करुन अहवाल सादर करावा असेही निर्देश सर्व सबंधित यंत्रणेला दिले आहेत.
या रुग्णांवर वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय पथकामार्फत उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा ( किनवट ) येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “ आरोग्य सेतू ऍप ” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते. असे सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसिलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने व पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी रुग्ण बाधित परिसराला भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!