Home नांदेड शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी शाळेचे आयोजन – उपविभागीय कृषि अधिकारी सुखदेव

शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी शाळेचे आयोजन – उपविभागीय कृषि अधिकारी सुखदेव

166

राजेश एन भांगे

नांदेड , दि. ०४ :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या कापूस व सोयाबिन पिकांच्या शेती शाळेतून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधीकारी आर. टी. सुखदेव यांनी केले.
कृषी विभागामार्फत जिल्ह्यात कृषी दिनानिमित्त 1 ते 7 जुलै 2020 दरम्यान कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने कृषी कापूस पिकावरील (विशेष सत्र) शेतीशाळेचे आयोजन मुदखेड तालुक्यातील वाडी मुक्ताजी येथे 1 जुलै रोजी करण्यात आले. शेती शाळेची सुरुवात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन करण्यात आली.
या शेतीशाळेच्या वर्गाला मार्गदर्शन कृ. प. बारड जी. पी. वाघोळे यांनी केले. कापुस पिकावर आढळुन येणारे रस शोषन करणाऱ्या किडी (मावा, तुडतुडे, पांढरी माशी) यांची निरीक्षणे कशी घ्यावीत. कापुस पिकाच्या परिसंस्थेचा अभ्यास कसा करावा याविषयी प्रत्यक्ष शेतात उतरुन निरीक्षण, चित्रीकरण, सादरीकरण कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.
सोबतच पिकावर आढळुन येणाऱ्या मित्र किडींचा (ढाल किडा,कातीन) यांची ओळख करुन देण्यात आली. मावा या किडीचा जीवनक्रम चित्रीकरणाद्वारे समजावुन सांगण्यात आला. निसर्गात उपलब्ध असलेल्या निंबोळया गोळा करुन त्यापासुन 5 टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दती समजावुन सांगण्यात आली. कपाशीवर आढळुन येणाऱ्या गुलाबी बोंड अळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळातच कामगंध सापळयांचे महत्व व उपयुक्तता याचे प्रात्याक्षीक करुन दाखवण्यात आले. या शेती वर्गात सांघीक खेळ (पावसाची टाळी) याद्वारे शेतकऱ्यांचे सामुहिक गुणदर्शन, आनंद व उत्साह वाढविण्यासाठी घेण्यात आला.ही शेतीशाळा दत्तराव इंगोले यांच्या शेतात घेण्यात आली. शेतीशाळा पुर्ण करण्यासाठी कृषी सहाय्यक श्रीमती. एस. डी. रेशमलवार, समुह सहाय्यक शरद कवळे, मन्मथ गवळी व शेतीशाळा समन्वयक श्री. देशमुख तसेच गावातील कापूस उत्पादक शेतकरी उपस्थीत होते.