Home मराठवाडा राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश…

राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश…

125

लक्ष्मण बिलोरे

जालना – राज्यभरातील लाखों गुंतवणूकदारांना कोट्यावधी रूपयांचा गंडा घालून २०१६ साली बंद पडलेल्या मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीच्या प्रकरणाला गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे राज्यातील हजारों गुंतवणूकदारांनी लक्षवेधी पत्रव्यवहार चालू ठेवला असून ईमेल ही पाठविले जात आहेत.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे कि, १९९८ साली मैत्रेयचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन सत्पाळकर यांनी मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीची स्थापना केली. २००३ साली मधुसुदन यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी वर्षा सत्पाळकर आणि तिचा भाऊ प्रसाद पुरूळेकर यांनी मॅनेजमेंटच्या माध्यमातून मैत्रेयची धुरा सांभाळली. २०१५ पर्यंत मैत्रेयचे राज्यभरात जाळे पसरले. मैत्रेयची संचालिका महिला असल्याने महिला प्रतिनिधी आणि गुंतवणूकदारांची संख्या झपाटय़ाने वाढली १७ वर्षात ४७ लाख गुंतवणूकदारांच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांची माया जमवून मैत्रेयची संचालिका वर्षा सत्पाळकर, तिचा भाऊ परुळेकर सहसंचालक मंडळ फरार झाले…

आणि तेथून पुढे प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार यांच्या हाल अपेष्टा सुरू झाल्या.महीला एजंटांना मारहाण, छेडछाड सुरू झाली. अनेक एजंटांनी आत्महत्या केल्या. मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनी बंद पडून चार वर्षे झाली या कालावधीमध्ये राज्यभरात आंदोलने झाली. मोर्चे काढले परंतु नाशिक वगळता इतर ठिकाणी गुंतवणूकदारांना छदामही मिळाला नाही. मैत्रेयचा परतावा मिळवण्या संदर्भात राज्य भरातील गुंतवणूकदारांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना ईमेल पाठवून तसेच पत्र पाठवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्य़ातील लाखों गुंतवणूकदार हैराण झाले आहेत.

मैत्रेय प्रकरणी नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून मैत्रेयची मुख्य संचालिका वर्षा सत्पाळकर चार वर्षांपासून फरारी आहे. मैत्रेय प्रकरणी नाशिक कोर्टामध्ये खटला सुरू असून शुक्रवारी, ३ जुलै रोजी सुनावणी आहे. नेहमी प्रमाणेच मैत्रेयचे आरोपी गैरहजर होते, नैसर्गिक आपत्तीमुळे आरोपींना सुनावणी साठी येता आले नाही, पुढील सुनावणी ३०जुलै रोजी आहे. असे आरोपींच्या वकिलांनी सांगितले अशी माहिती शशांक अहिरे यांनी सोशल मीडियावर दिली. जालना पोलिसांनी सांगितले की, मैत्रेयची प्रॉपर्टी जप्त करण्यात येत आहे तसेच गुंतवणूकदारांनी आपले गुंतवणूक केलेले सर्टिफिकेट, शेवटची पावती, आधारकार्ड, बॅकपासबुक झेरॉक्स प्रती आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात जमा करावीत.