Home विदर्भ जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक आर्णीच्या प्रतिबंधित क्षेत्रात ‘ऑनफिल्ड’

जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक आर्णीच्या प्रतिबंधित क्षेत्रात ‘ऑनफिल्ड’

122

यवतमाळ , दि. 22 :- सुरवातीला शहरी भागात असलेला कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झाला आहे. ही नक्कीच चिंतेची बाब असली तरी संपूर्ण प्रशासन ‘हाय अलर्ट’ राहून कार्य करीत आहे.

आर्णी येथे पॉझेटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी आज (दि.22) आर्णी येथील प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष जावून परिस्थितीचा आढावा घेतला.
आर्णी येथील प्रतिबंधित क्षेत्रात 89 कुटुंब असून लोकसंख्या 369 आहे. या भागात आढळलेल्या पॉझेटिव्ह रुग्णाच्या अगदी निकटच्या संपर्कातील (हाय रिस्क काँटॅक्ट) सात जणांचे आणि जवळच्या संपर्कातील (लो रिस्क काँटॅक्ट) 46 जणांचे नमुने सोमवारी तपासणीकरीता पाठविण्यात आले. या प्रतिबंधित क्षेत्रातून आणखी किमान 50 जणांचे नमुने तपासणीकरीता त्वरीत पाठवावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. या भागासाठी आरोग्य विभागाचे तीन पथक कार्यरत असून एक फिवर क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. आरोग्य पथकाच्या सहाय्याने नागरिकांची पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनरने तपासणी होत असून ही तपासणी अतिशय काळजीपूर्व करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
तसेच आर्णी येथील उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार धीरज स्थूल व संपूर्ण आरोग्य यंत्रणा 24 बाय 7 कार्यरत आहे. नागरिकांनीही शासन आणि प्रशासनाच्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. विनाकारण बाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीकरीता गेले असता सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आवश्यक करावा. वारंवार साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे. कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार धीरज स्थूल आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात एकूण 63 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह : रविवारी रात्री दारव्हा येथील सात जणांचे रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉजिटिव्हची संख्या 63 वर गेली आहे. सर्व ॲक्टीव्ह पॉजिटिव्ह शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, तालुक्यातील इतर कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर येथे भरती आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी 53 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 3790 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3460 प्राप्त तर 330 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 232 आहे. यापैकी 63 एक्टिव पॉजिटिव्ह असून 161 लोकांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात 8 लोकांच्या मृत्युची जिल्ह्यात नोंद आहे. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 36 जण भरती आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3228 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.