Home मराठवाडा पैनगंगेत बुडणाऱ्या तरुणाचा जीव वाचवला. किनवटमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक

पैनगंगेत बुडणाऱ्या तरुणाचा जीव वाचवला. किनवटमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक

175

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. ०६ :- हॅलो… तहसिलदार साहेब, गंगानगर जवळील पैनगंगा नदीच्या डोहात एक मुलगा पडलेला आहे, तो बुडतो आहे. त्याला तात्काळ वाचवणे गरजेचे आहे. कृपया आपले आपत्ती व्यवस्थापन पथक पाठवून त्याचा जीव वाचवा.

ही विनंती... असा फोन आल्यानंतर लगेच तहसीलदार उत्तम कागणे यांनी किनवट नगर परिषदेच्या जीवरक्षक दलाला तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहण्याच्या सूचना देऊन आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला सोबत घेऊन पैनगंगा नदीपात्र गाठले. लाईफ जॅकेट, तराफा, ट्यूब व दोरीच्या साह्याने पाण्यात बुडणाऱ्या तरूणास सुखरूप तीरावर आणले. सदरील प्रकार पाहून नदीपात्रा वरील उपस्थित नागरिक थक्क झाले. परंतु हा सर्व प्रकार संभाव्य पूरस्थितीच्या पूर्वी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक असल्याचे कळाल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
किनवट तालुक्याची विदर्भ सीमा पैनगंगा नदी आहे. नदीपात्रावरील २२ गावे ही पूरग्रस्त आहेत. आता पावसाळ्याला सुरुवात होते आहे. या काळात पूरासारखी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास आपत्ती व्यवस्थापनाचं पथक सज्ज असणार आहे. याचाच एक भाग म्हणून किनवट शहरातील गंगानगरच्या लगत पैनगंगा नदी पात्रातील बंधाऱ्याजवळ शुक्रवारी (ता. पाच ) साहित्यासह जीवरक्षक पथक तिथे पोहोचले .
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर व सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले .
तहसीलदार उत्तम कागणे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे गजानन हिवाळकर, जनजागृती कक्षाचे उत्तम कानिंदे, मंडळ अधिकारी पी.व्ही. बुरकुले, तलाठी नवीनरेड्डी, नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक तथा कार्यालय अधीक्षक चंद्रकांत दुधारे, अग्निशमन दलाचे सटवा डोखळे, रविचंद्र सुकनीकर, सुरेश चव्हाण, अजहरअली ताहेरअली आणि जीवरक्षक दलातील कार्यरत सर्व कर्मचारी यांनी प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला.
यावेळी नदीच्या डोहात वाहून जाणाऱ्या तसेच बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव कसा वाचवावा हे दाखविण्यात आले. नदीपात्रात लाईफ जॅकेट घालून जीव रक्षक दलाचे कार्यकर्ते उतरले आणि बुडणाऱ्या व्यक्तीला अलीकडील तिराजवळ सुखरूप आणले .