
,औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयातील प्रकार; रात्रभर मुक्काम
अब्दुल कय्युम
औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयात एकाने रात्रभर वाघाच्या पिंजऱ्यात मुक्काम केल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी (ता. चार) समोर आला आहे. प्राणिसंग्रहालयाच्या पाठीमागील भिंतीवरून सोमवारी (ता. एक) रात्री त्याने उडी मारली अन् तो वाघाच्या पिंजऱ्यात पडला. मात्र, त्याचे नशीब बलवत्तर होते. यावेळी वाघ आतल्या पिंजऱ्यात होते. दरम्यान, या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यास जागा नसल्याने रात्रभर तो त्याच ठिकाणी झोपून राहिला. सकाळी सुरक्षारक्षकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकाराने प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सूत्रांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयाच्या पाठीमागील भिंत कमकुवत आहे. या भिंतीवरून एकाने सोमवारी मध्यरात्री उडी मारली व तो थेट पिवळ्या वाघाच्या पिंजऱ्यात (सर्व्हीस एरिया) पडला. ही जागा बंदीस्त असून, वाघांच्या फिरण्यासाठीची आहे. मात्र, रात्रीच्यावेळी वाघ आतल्या पिंजऱ्यात ठेवले जातात. त्यामुळे तो वाचला. या पिंजऱ्याला लागूनच खंदक आहेत. त्यामुळे या पिंजऱ्यातून बाहेर पडणे शक्य नसल्यामुळे तो तेथेच थांबला.
हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी सात-साडेसातच्या सुमारास प्राणिसंग्रहालयातील सुरक्षारक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी वरिष्ठांना माहिती कळविली. वरिष्ठांच्या आदेशानुसार क्रांतीचौक पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, तोपर्यंत तब्बल सात तास तो वाघांच्या पिंजऱ्यात होता.











































