
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात परत एकदा 31 मेपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती समोर आलीय. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच 17 मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्य सरकारने मात्र लॉकडाऊन वाढवले जाणार कि त्यामध्ये शिथिलता आणली जाणार याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. मात्र आज अखेर राज्य सरकारकडून 31 मेपर्यंत लॉकडाऊन असणार अशी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं होतं.
कसा असेल लॉकडाऊन 4.0
राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर या प्रमुख शहरात वाढताना दिसतच आहे. त्यामुळं ही प्रमुख शहरं रेड झोन क्षेत्रात येत असून या शहरांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अटी शिथिल न करण्याच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील जिल्ह्यांची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आलीय. यामध्ये रेड, ग्रीन, आणि ऑरेंजमध्ये जिल्ह्याची विभागणी केली आहे. त्यानुसार शहरातील काही भागांमध्ये जिथे रुग्ण आढळले नाहीत अशा भागांमध्ये सूट देण्याचा जवळपास निर्णय राज्य सरकार घेतला आहे. 18 मे पासून ग्रीन ऑरेंज आणि रेड झोन क्षेत्रात आरटीओ सब रजिस्टार शासकीय कार्यालय जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, मोठ्या प्रमाणात लोक शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर करत आहेत. अशा काळात ग्रामीण भागांमध्ये सुद्धा अधिक कडक अंमलबजावणी करण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये जी लोकं स्थलांतरित होणार आहेत, त्यांना विलगीकरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागांमध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोन आहेत या क्षेत्रात रुग्ण संख्या वाढू नये यासाठी देखील नवे काही कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्रासह देशभरात 25 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. देशातल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपणार आहे. याबाबत लवकरच केंद्र सरकार घोषणा करणार आहे. या घोषणेकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.










































