Home मराठवाडा जालन्यात प्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेला मिळाली सुट्टी…

जालन्यात प्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेला मिळाली सुट्टी…

209

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना – जालना शहरात सर्व प्रथम कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेली जुना जालना भागातील दुःखीनगर मधील ६५ वर्षीय महिला पूर्णपणे तंदुरुस्त झाली असून या महिलेला तब्बल ४० दिवस करण्यात आलेल्या उपचारानंतर आज शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हा सरकारी रुग्णालयातून सन्मानपूर्वक सुट्टी देण्यात आली आहे.

दुःखीनगर भागातील ६५ वर्षीय असलेली ही महिला आपल्या शिक्षक असलेल्या मुलीला सीईटीची परीक्षा द्यावयाची असल्याने तिच्या सोबत दिल्ली येथे रेल्वेने गेली होती. परीक्षा दिल्यानंतर दिल्ली येथून रेल्वे न मिळाल्याने या दोघीही मायलेकी दिल्ली येथून रेल्वेने हेंद्राबाद येथे आणि तेथून जालना येथे आल्या होत्या. जालना येथे पोहचल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने जालना शहरातील दोन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत काहीच फरक न पडल्याने त्यांना दि.५ एप्रिल रोजी जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले होते. दि.६ एप्रिल रोजी या महिलेच्या लाळेचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्रयोग शाळेकडून सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील प्रथम रुग्ण या महिलेच्या रूपाने समोर आली होती. विशेष म्हणजे या महिलेची मुलगी जालना तालुक्यातील रांजनी येथे जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असून ही शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आपल्या आईसोबत प्रवासात सहवासात आल्याने आणि प्रवासावरून परतल्यानंतर सदर शिक्षिका रांजनी येथे शाळेत हजर असल्याचे कळल्यानंतर जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा आणि रांजनी येथील ग्रामस्थांची झोप उडाली होती. दरम्यान, जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत असताना या महिलेच्या लाळेचे नमुने पाचवेळा प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी तीन वेळा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर सलग दोन वेळा निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला होता. मात्र न्यूमोनियासह अन्य आजार असल्याने सदर महिलेवर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते.तब्बल ४० दिवस औषधोपचार घेतल्यानंतर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांच्या नेतृत्वाखाली खालील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर जालना जिल्ह्यात प्रथमच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलेला आज शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हा सरकारी रुग्णालयातर्फे सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला आहे.

पारधची तरूणीही ठणठणीत- भोकरदन तालुक्यातील पारध येथील सतरा वर्षीय तरुणीचा सलग दुसरा अहवाल काल गुरुवारी रात्री निगेटिव्ह प्राप्त झाला असल्याने या तरुणीची देखील आज शुक्रवारी सुट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.