Home महत्वाची बातमी लोकडाऊन मूळे भाकर न मिळाल्या मूळे झाला त्या वृद्ध दांपत्याचा मृत्यू ,

लोकडाऊन मूळे भाकर न मिळाल्या मूळे झाला त्या वृद्ध दांपत्याचा मृत्यू ,

163

सर्वत्र दुःख हळहळ ,

अमीन शाह ,

सोलापूर : करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सोलापुरातील शास्त्रीनगर झोपडपट्टीतील एका घरात वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह सापडले. या दोघांचाही उपासमारीमुळे दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे, या दाम्पत्याचा गतिमंद मुलगा दोन दिवसांपासून आपले आईवडील वारल्याचे सांगत होता. मात्र, त्याची ती आर्त हाक सरकारी यंत्रणा आणि शेजारी यांनी गांभीर्याने घेतलीच नाही.
अब्दुल गनी शिलेदार (वय ६५) आणि त्यांच्या पत्नी हसीना (६०) हे आपल्या गतिमंद मुलासह शास्त्रीनगरमधील एका झोपडीत राहात होते. वयोमानामुळे तसेच प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांना घरात जेवण बनवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांचे काही नातलग त्यांना दररोज जेवणाचा डबा पोहोचवत तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही करत. मात्र, या झोपडपट्टीत करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने गेल्या दहा दिवसांपासून हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आणि शिलेदार कुटुंबाच्या रोजच्या जेवणाची आबाळ होऊ लागली. नजीकच्या भागात राहणाऱ्या त्यांच्या एका नातलगाने ५ मे रोजी कसेबसे शास्त्रीनगरमधील शिलेदार यांचे घर गाठले व त्यांना जेवणाचा डबा पोहोचवला. मात्र, त्यानंतर त्यांना येथे येणे शक्यच झाले नाही. यातूनच उपासमार आणि प्रकृती बिघडल्यामुळे या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, आपल्या आईवडिलांचा मृत्यू झाल्याचे त्यांचा गतिमंद मुलगा इसाक याने गल्लीत राहणाऱ्या काहींना सांगितले. मात्र, गतिमंद असलेल्या इसाकचे म्हणणे कुणीच गांभीर्याने घेतले नाही. दोन दिवसांनंतर या घरातून दुर्गंधी सुटू लागल्यानंतर काही शेजाऱ्यांनी शिलेदार यांच्या घरात धाव घेतली. निपचित पडलेल्या वृद्ध दाम्पत्याला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसांपूर्वीच या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. त्यांच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही. वृद्धत्व, अशक्तपणा आणि उपासमारीमुळे हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान, टाळेबंदी काळात शास्त्रीनगरात सर्व रेशनकार्डधारकांना रेशनधान्य वाटप करण्यात आले होते. त्यात शिलेदार कुटुंबाला धान्य मिळाले की नाही, याची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी म्हटले आहे.