Home विदर्भ वर्धेत कोरोनाचा पहिला रुग्ण

वर्धेत कोरोनाचा पहिला रुग्ण

98

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

हिवरातांडा येथील महिलेचा करोनामुळे मृत्यू.!

हिवरा गाव प्रतिबंधित क्षेत्र , 3 किलोमीटर परिसरातील 7 गावाची नाकाबंदी तर निकट संपर्क शोध सुरू

वर्धा , दि 10 :- आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावातील एका महिलेचा विनोबा भावे रुग्णालायत 8 मे ला मृत्यू झाला. सदर रुग्णाला दम्याचा त्रास होता. त्यांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले होते त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी दिली. या पार्श्वभूमीवर हिवरा तांडा गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नाकाबंदी करण्यात येत असून 3 किलोमीटर परिसरातील 7 गावांची सुद्धा नाकेबंदी करण्यात येत आहे.

आर्वीपासून दहा किलोमिटर अंतरावरील हिवरा तांडा गावातील महिलेला दम्याचा त्रास असल्या कारणाने ती 8 मे ला सकाळी 8 च्या सुमारास आर्वीतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. मात्र तिला आराम न पडल्याने ती दुपारी आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. तिथे तिच्यावर उपचार सुरू असताना तिची लक्षणे कोरोना सारखी वाटल्याने तिला उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेने वर्धेतील विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विनोबा भावे रुग्णालयात तिच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले. त्याचा अहवाल आज रविवारी 10 मे रोजी प्राप्त झाला. यात ती महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यावर हिवरा तांडा गाव वाहतूक व रहदारीसाठी बंद करण्यात आले.

सदर रुग्णाला परदेशी प्रवासाचा इतिहास नाही. त्यामुळे ती कोणा – कोणाच्या संपर्कात आली, तसेच तिचे कुटुंबातील व्यक्ती कुणाच्या संपर्कात आलेत याचा शोध घेणे सुरू आहे. या महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्त्राव घेण्यात येत असून त्यांना संथात्मक अलगीकरण करण्यात येत आहे. तसेच मृत व्यक्तीच्या 14 दिवसाच्या कालावधीत संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना गृह विलगीकरण करण्यात येत आहे अशी माहिती श्री मडावी यांनी दिली.

हिवरा तांडा सहित 3 किलो मीटर परिसरातील हिवरा, जामखुटा, राजनी, हराशी, बेल्हारा, बेल्हारा तांडा, थार, पाचोड या गावांची वाहतुकीसाठी नाकेबंदी करण्यात आली आहेत. तसेच 7 किलोमीटर परिसरातील वाढोणा, बेढोणा, चिंचोली डांगे ही गावे सुद्धा वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी सांगितले.

याशिवाय वर्धेतील विनोबा भावे रुग्णालयात वाशीम जिल्ह्यातील एक 64 वर्षीय रुग्ण न्यूमोनियाच्या उपचारासाठी दोन दिवसांपूर्वी दाखल झाला होता. त्याचा कोरोना चाचणी अहवाल आज मिळाला असून सदर रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे सुरू असून त्यांनाही संस्थात्मक अलगिकरण करण्यात येणार आहे.