Home विदर्भ बा ……भारत देशा , “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”

बा ……भारत देशा , “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”

170

देवानंद जाधव

यवतमाळ – चायनाने आंदन दिलेल्या कोरोणाची आग जगभर धुमसत आहे. त्याची आच गावखेड्याकडे पोहोचली आहे. त्यामुळे सर्वांचेच आयुष्य काळवंडून गेले आहे. रब्बीचे पिक घरातच उरावर पडुन आहे. त्यातल्या त्यात खरीप हंगाम उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील तमाम भूमिपुत्रांचा जीव टांगणीला लागला आहे.

कसं होईल त् होवो बाप्पा, अशा निराशेच्या वातावरणात शेतकरी जगत आहे. अवघा देश कुलूपबंद आहे. परिणामी शेतकर्यांचा अर्थ संकल्प चोळामोळा झाला आहे. अवघ्या मानव जातीच्या तमाम पोटासाठी किंबहुना त्यांच्या भुकेची आग शमविण्यासाठी, सबंध शेतकर्यांने तिसरा बैल बनुन, तिफणीचे रुमणे हाती घेण्याची तयारी केली आहे. काळ्या मातीवर घरातील चिल्यापिल्यासह घामाचा अभिषेक घालुन, खरिपाच्या सुगीचे स्वप्न डोळ्यात पेरून घेतले आहे. बायकोच्या गळ्यातील फुटक्या मण्याचं मंगळसूत्र गहान ठेऊन,कोंबड्या बकर्या कसायाच्या स्वाधीन करुन, पेरणीची सोय लावण्यासाठी शेतकरी बरगड्या उघड्या पडे पर्यंत भटकंती करत आहे.

यावर्षी बि बियाणे, अन् रासायनिक खतांचा मानवनिर्मित तुटवडा निर्माण होईल का? ही भिती शेतकर्यांच्या डोळ्यात आसवांचे ढग निर्माण करत आहे. शेतकर्यांच्या आयुष्याच्या सातबार्या वर आधीच आभाळभर असलेली दुःखाची नोंद, माणसाचं काळीज घायाळ करणारी आहे. आम्ही भोगलं, सोसलं, कष्ट ऊपसले पण आमच्या जीवनातील अंधार पुसुन टाकता आला नाही, हि वेदनाच तमाम भूमिपुत्रांना वेदना देत आहे. सरकारच्या सासुरवासाने आणि सततच्या नापिकीने कर्जाच्या ओझ्याखाली येऊन आत्महत्या करणार्या यवतमाळ जिल्ह्याने आधीच जगाच्या नकाशात आपले तोंड काळे करुन घेतले आहे. दारिद्र्य, वाढती महागाई, निराधारता, भुक,न परवडणारे आजार हे शेतकर्यांच्या घरात पाचविलाच पुजलेले बोनस आहे. कापूस, ऊस, सोयाबीन आणि अन्य शेती माल विकुन, कर्ज फेडण्याचे आणि वयात आलेल्या मुली चे हात पिवळे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या शेतकर्याची स्वप्ने दिवास्वप्न ठरलीत. हजारो रुपयाचे बि बियाणे मातीत टाकुन नसिबाचे प्रमाणपञ आभाळासमोर ठेवणार्या शेतकर्यांचा अनेकदा भ्रमनिरास झाला आहे. आजमितीला शेतकर्यांचा जीव कासावीस झाला आहे. ऊद्या च्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंता त्यांच्या मेंदवर डागण्या देत आहे.

एकंदरीत कमी अधीक शेतकर्यांची अवस्था अर्धवट ठेचलेल्या सापासारखी झाली आहे. येथे कागदावर केवळ रेषा ओढणार्याला, अलीशान अन्न, वस्त्र निवारा मिळतो आहे. आणि स्वतः च्या रक्ताच्या फाळाने जमिन नांगरणार्या धरतीच्या धन्याला, स्वातंत्र्याच्या सत्तर, बहात्तर वर्षानंतर देखील, उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळण्याची आशा करणे म्हणजे, आधळ्यांच्या शहरात आरसे विकण्यासारखे झाले आहे. वारा, वादळ, वावरातील ढेकळं, ऊषाला घेऊन झोपणारी आमची शेतकर्यांची औलाद, अंगठ्याचा पट्टा तुटलेल्या आणि घासलेल्या टायरच्या चपला पायात घालुन, जगाच्या भुकेची आग शमविण्यासाठी काबाडकष्ट करतो आहे. सध्या गुळगुळीत डांबरी रस्त्यावर हरभरे भाजुन निघावित अशी आग सुर्य ओकतो आहे. अशाही निराशेच्या गर्तेत आम्ही सुध्दा रक्ताचं पाणी करून, वावरात घाम गाळतो आहे. नव्हे ते आमच्या प्रारब्धाचाच एक भाग आहे?सध्या कोरोणा , ( कोवीड 19 ) महामारी या कान बधिर करणार्या शब्दांची सर्वञ रेलचेल आहे. आपल्या देशावर असणार्या महामारीच्या भितीने, शेतकर्यांच्या डोळ्यातुन ओघळणार्या आसवांच्या थेबात जणु कोरोणा चे प्रतिबिंब दिसावेत, अशी भयान अवस्था सर्व दुर दिसत आहे. तरीही आम्ही तुमच्या पोटासाठी राबतो आहे. रखतखत्या ऊन्हात काळ्या मातीतून मोती पिकवणारा, यवतमाळ तालुक्यातील रुई (वाई) येथील मायबाप शेतकरी यशवंत पखाले आपल्या देशाला उद्देशून म्हणतो,
बा….भारत देशा……
!! भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!!
…….पण आम्हा शेतकर्यांच्या पाठीशी कोण? या ह्रदय पिळवटून टाकणार्या प्रश्नांचे उत्तर आता ही अनुत्तरितच आहे.

!! जय किसान, जय जवान!!