
नांदेड, दि, ३० ( राजेश भांगे ) – नांदेड मध्ये अडकलेल्या पंजाबच्या यात्रेकरू अखेर आपापल्या घरी पोहोचले आहेत. मात्र, पंजाबमध्ये पोहोचल्यानंतर एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पंजाबमध्ये पोहोचल्या नंतर या प्रवाशांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३८ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यात काही यात्रेकरूंचे अहवाल येणं बाकी आहे. या यात्रेकरूंची सेवा करणाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यात्रेकरूंना सोडवण्यास गेलेल्या सर्व चालकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
हल्ला महल्लासाठी पंजाब मधून काही भाविक नांदेडमध्ये आले होते. त्यानंतर लॉकडाउन लागू झाल्या नंतर ४० दिवसांपासून हे भाविक मुक्कामाला होते.
त्यांना परत नेण्यासाठी पंजाब सरकारकडून प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्र सरकार आणि पंजाब सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर केंद्रानं त्यास परवानगी दिली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ट्रॅव्हल्सनं तेरा गाड्यामधून १७०० जणांना घरी सोडण्यात आलं. परवा सायंकाळी हे आपापल्या घरी पोहोचले. पंजाबमध्ये पोहोचल्यानंतर स्थानिक प्रशासनानं त्यांचे स्वॅब घेण्यास सुरूवात केली होती. यापैकी गुरूवारपर्यंत ३८ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. दुसऱ्या टप्प्यातील पंजाब सरकारच्या लक्झरी गाड्यां मधून गेलेल्या तीन हजार यात्रेकरूचींही तपासणीही केली जाणार आहे.
दरम्यान, यात्रेकरूनां सोडण्यासाठी गेलेल्या ट्रॅव्हल्स बुधवारी रात्री नांदेड शहरात परतल्या. या गाड्यांना सीमे वरच रोखण्यात आलं. त्यानंतर ३० चालकांना एका आयुर्वेदिक महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या सर्वांना पुढील १४ दिवसांसाठी इथे ठेवण्यात येणार आहे.
यात्रेकरूंच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी…
यात्रेकरूंच्या संपर्कात आलेल्या सेवेकऱ्यांची वैद्यकिय तपासणी प्रशासनानं सुरू केली आहे. जवळपास अडीचशे जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. प्राथमिक तपासणी मध्ये या सेवेकऱ्यांना करोनासदृश्य कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं त्यांची चाचणी करण्यात येणार आहे.











































