Home विदर्भ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे सामाजिक चळवळीतील योगदान…!

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे सामाजिक चळवळीतील योगदान…!

1003
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जयंती अर्थात ग्रामजयंती.

वर्धा – २० व्या शतकातील महान कर्मयोगी,मानवतेचे पुजारी,युगप्रवर्तक या विशेषणांनी ज्यांना ओळखले जाते ते संत म्हणजे वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज होय. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात यावली(शहीद) या गावी झाला.स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी “राष्ट्रसंत”या उपाधीने तुकडोजी महाराज यांना गौरविण्यात आले.कारण की त्यांनी समाजासाठी, देशासाठी उद्धारक कार्य केले वंदनिय तुकडोजी महाराज यांनी १९०९-१९६८ या काळामद्ये भजन,किर्तन तसेच साहित्य लेखनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.यामद्ये धर्मनिरपेक्षता,अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सक्षमीकरण, सामजिक समता प्रस्थापित करण्याच्या हेतू ने मौलाचे योगदान दिले आहे.

स्वयंपूर्ण गाव:देशाचा मानबिंदु:-

व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या लेखनातून ठायी ठायी राष्ट्रवाद,राष्ट्रीय एकात्मता,स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या संबंधीचे त्यांचे चिंतन प्रकट होते.हिंदुस्तान हा खेड्यांनी बनलेला देश आहे.तेव्हा खेड्यांची सुधारणा झाली तरच देशाची प्रगती होईल हे ओळखून त्यांनी ग्रामसुधारणेची मोहीम हाती घेतली.त्यांच्या समग्र साहित्यातील एक साहित्य म्हणजे ग्रामगीता हा ग्रंथ होय.हा ग्रामगीता ग्रंथ तुकडोजी महाराज यांनी ग्रामातील शेतकऱ्याला अर्पण केला.ग्रामगीता ग्रंथ ओवी क्र.४९ अ.पहिला यात तुकडोजी महाराज असे म्हणतात की,

गाव हा विश्वाचा नकाशा।गावावरून देशाची परीक्षा। गावची भंगता अवदशा।येईल देशा।।

सद्यस्थितीत संपूर्ण विश्वात अशांतता पसरली आहे.विज्ञानाच्या परमोच्च संशोधनामुळे मानव उन्नतीकडे जाण्याऐवजी विनाशाकडे वाटचाल करीत आहे.विज्ञानाने प्रगती दिसत आहे परंतु माणसातील माणुसकी नष्ट होत आहे.मनावर होणारे आध्यात्मिक ऱ्हास होणे हे विज्ञानालाही घातक ठरणार आहे.या विश्वात शांतता व समृद्धी आणावयाची झाल्यास गाव समृद्ध होणे आवश्यक आहे.यासाठी तुकडोजी महाराजांचा ग्रामगीता या ग्रंथाचा अंगीकार करणे एकमेव उपाय आहे.ग्रामगीता ही फक्त वाचण्यासाठी नसून *”वाचता वाट दावी जनासी”* ती आचरणात आणुन त्यायोगे त्यातील सुसंस्कार समाज मनावर बिंबवायचे आहे.अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम असलेल्या या ग्रंथातील विचाराने समाजमन घडवायचे आहे.ग्रामगीतेतील तिसरे पंचक म्हणजे ग्रामनिर्माण पंचक यामद्ये ग्रामरक्षण,ग्रामसमृद्धी, ग्रामनिर्माणकला,ग्राम-आरोग्य,गोवंश-सुधार या अध्यायात राष्ट्रसंतांनी गाव कशी स्वयंपूर्ण होतील यावर भर देऊन प्रत्येक व्यक्तीने श्रम करून स्वतः च्या उपजीविकेचे साधन निर्माण करावे.कुणीही मागासलेला राहू नये.प्रत्येकाने एकमेकांसोबत माणुसकीच्या नात्याने आपले वर्तन केले पाहिजे तेव्हाच ग्राम समृद्ध होईल. गाव हेच देऊळ आहे आणि त्या देवळातील देव म्हणजे गावातील लोक हे प्रतिपादित करतांना तुकडोजी महाराज ग्रामगीता ओवी क्र.५४ अ.पहिला यामद्ये असे म्हणतात की,
*जाणावे ग्राम हेचि मंदिर। ग्रामातील जन सर्वेश्वर। सेवा हेचि पूजा समग्र। हाचि विचार निवेदावा।।*
*महिला सक्षमीकरण:-* स्त्री ही अबला किंवा दुर्बल नसून ती एक शक्ती आहे.स्त्रियांनीच महापुरुष, लढवय्ये,थोर संत यांना जन्म दिला आहे असे वं.तुकडोजी महाराज म्हणत असे.यावर कडक प्रहार करतांना लहरकी-बरखा या ग्रंथात महाराज असे म्हणतात की,
*”नारी नही अबला है ये,इसे क्यो किया बदनाम है। मौका नही तुने दिया,देखा न उसका काम है।। आदर्श देवी मानकर,तू शक्ती उसको माँगता। यहभी समय आता कि अबला को सबल जग जानता।।*
वस्तुतः स्त्रियांच्या उद्धाराविषयी कळवळा हा महाराष्ट्रियन संतांना ठाऊक नाही असे नाही.स्त्रियांच्या अध्यात्मिक योग्यतेची ग्वाही वेदकालापासून ज्ञानेश्वरांच्या काळी व आजही मिळत आहे.संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीता या ग्रंथात स्त्रियांची महती पटवून देण्यासाठी अध्याय विसावा महिलोन्नती हा टाकला आहे.यामद्ये ओवी क्र.४ मद्ये तुकडोजी महाराज म्हणतात की,

मातेच्या स्वभावे पुत्राची घडण।त्यास उज्वल ठेवी तिचे वर्तन।।स्त्रीच्या तेजावरीच पुरुषाचे मोठेपण। ऐसे आहे।।

वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर मानवतेचा ध्यास घेतला.त्यांच्या कार्याचे क्षेत्र होते गावकुस ते देशाची सीमा.स्वातंत्र्य,समता,बंधुत्व या मुल्यांचा पुरस्कार करत मानवतावादी भूमिका त्यांनी घेतली. खर म्हणजे स्त्री ही स्वतंत्र झाली होती परंतु मुलगा-मुलगी हा भेद तीव्र झाला.राष्ट्रसंत ग्रामगीता ओवी क्र.३ अ. एकविसावा यामद्ये असे म्हणतात की,

स्त्री-पुरुष ही दोन चाके। जरी परस्पर सहाय्यके। तरीच संसार-रथ चाले कौतुके। ग्राम होई आदर्श।।

राष्ट्रसंत स्त्री-पुरुष विषमतेवर प्रहार करतात.उलट स्त्रीच्या तेजावरीच पुरुषाचे मोठेपण आहे असा स्त्रियांविषयीचा आत्मविश्वास व्यक्त करतात.उलट स्त्रिया ह्या पुरुषांच्या तुलनेत गुणात्मकदृष्ट्या सरस ठरतात असा विचार मांडतात.
*शैक्षणिक दृष्ट्रीकोन:-* राष्ट्रसंत तुकडोजी हे शिक्षणतज्ञ होते.शिक्षणाद्वारे माणसांच्या मनातील न्यूनगंड दूर झाला पाहिजे,पुस्तकी शिक्षणातून समाजाचा विकास होणार नाही,खेड्यातून उच्च शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था उभारल्या पाहिजेत असे ते म्हणत.समाजशिक्षण हा प्रचलित प्रौढ शिक्षणासाठी वापरलेला राष्ट्रसंतांचा शब्द आहे.विज्ञान शिक्षण शेतीसाठी आवश्यक आहे अशी त्यांची धारणा होती.शिक्षणासोबतच श्रमप्रतिष्ठा महत्वाची आहे स्वच्छता हाच आनंदी जीवनाचा जारा आहेत असे ते म्हणत.ग्रामगितेच्या माध्यमातून अध्याय क्र.१९ मद्ये जीवन शिक्षणाची संकल्पना त्यांनी मांडली.तुकडोजी महाराजांच्या कार्याची दखल शासनाने घेऊन नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले.तुकडोजी महाराज सदविचार प्रवाह या ग्रंथात असे म्हणतात की, *”यही विश्व का शिक्षण है। उपकारक हो जीवन है।।”*
आपल्या भजनाच्या माद्यमातून शिक्षणाची महती पटवून देतांना म्हणतात की, *”शिक्षण घेऊनी करू दिवाळी,अज्ञानाची करुनी होळी.*” राष्ट्रसंतांनी फक्त शालेय शिक्षणाचाच विचार केला होता असे जर आपण म्हटले तर ते पूर्णपणे चूक ठरेल.शालेय शिक्षणांने ज्ञान येते,लोक लोक शिक्षणाने कर्तव्याची जाणीव होते,हे जरी असले तरी दैनंदिन व्यवहारात जीवनमूल्याचे एक निराळे अधिष्ठान आहे.जर जीवनात जीवनमूल्ये व तत्वनिष्ठेचे अधिष्ठान नसले तर सुदृढ समाज जन्मास येऊ शकत नाही.आणि म्हणूनच समाजास जीवन शिक्षणाची आवश्यकता आहे.ग्रामगीता ओवी क्र.२० अ. विसावा यात तुकडोजी महाराज असे म्हणतात की,
*विद्येअंगी व्हावा विनय। विद्या करी स्वतंत्र निर्भय। शिक्षणाने वाढावा निश्चय। जीवन जय करावया।।*
जीवनात साध्य,साधन आणि साधक यांचा संगम झाला पाहिजे,जर हा संगम झाला तर जीवनाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.हे तेवढे सुनिश्चित आहे.आपले मन,बुद्धी व इंद्रिये यांचा विकास याच मार्गाने झाला पाहिजे.म्हणजे मग जीवनाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही.हे पटवून देतांना तुकडोजी महाराज ओवी क्र.२१ अ.विसावा यात असे म्हणतात की,
*यासाठीच शिक्षण घेणे।की जीवन जगता यावे सुंदरपणे।दुबळेपण घेतले आंदणे।शिक्षण त्यासी म्हणो नये ।।*
*धर्मनिरपेक्षता दृष्टीकोन*:-संत तुकडोजी महाराज आपल्या भजनामद्ये असे म्हणतात की, *”सब के लिए खुला है मंदिर यह हमारा*
*मदभेद को भुला है मंदिर यह हमारा*
आओ कोई भी धर्मी,आओ कोई भी पंथी
देशी-विदेशिंयोको मंदिर यह हमारा.”
हीच समतेची भावना राष्ट्रसंत तुकडोजींच्या भूमिकेत सदैव अन्युस्युत असे.१९४८ साली दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या भाषणात हिंदु-मुस्लिम-शिख-ख्रिस्ती-पारशी-बौध्द इ.धर्माबद्दल ते म्हणाले होते,”यह धर्म तो देश-काल की हवा के रिवाज है।”राष्ट्रसंत म्हणतात,”खरा तो एकच धर्म,वैश्विक मानवधर्म।
*”मानवता ही धर्म मेरा। इन्सानियत है पक्ष मेरा।।*”या उक्तीनुसार १९४३ पासुन संपूर्ण मानवजातीला एकसंघ बनविण्यासाठी सामुदायिक प्रार्थना ही उपासना सुरू केली.हीच उपासना अखिल मानवजातीला एकसूत्रतेमद्ये आणनारी उपासना आहे.वं.तुकडोजी महाराज ओवी क्र.५ अध्याय दुसरा धर्माध्ययन यात असे म्हणतात की, *”आपुली साधावी उन्नती। सौख्य द्यावे इतरांप्रति।या उद्देश जी जी संस्कृती। धर्म म्हणावे तिजलागी।।*
*अस्पृश्यता निवारण*:- वं.तुकडोजी महाराज अस्पृश्यता या समाजातून नष्ट व्हावी म्हणून आपल्या भजनाच्या माद्यमातून विशद करतांना असे म्हणतात की, *”हा जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता समुळ नष्ट हो जगातुनी.”*
मंदिरे अस्पृश्यासाठी खुली झाली पाहिजेत,मंदिरे म्हणजे खाजगी मालमत्ता नव्हे. देवळावर कोणा एका विशिष्ट जातीचा हक्क नाही असे तुकडोजी महाराज म्हणत.आर्थिक समता प्रस्थापित होऊन शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा असे राष्ट्रसंतांना वाटे.पंढरपूरचे विठोबाचे मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण सुरू केले तेव्हा तुकडोजी महाराजांनी त्यांना पाठिंबा दिला.केवळ एक महिन्यात विदर्भातील ५२ मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली होती.
*स्वातंत्र्य चळवळीतील योगदान*:- प्राथमिक चौथा वर्ग शिकलेल्या तुकडोजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाज सुधारणेकडे लक्ष दिले.तुकडोजी हे फक्त संत नव्हते तर राष्ट्रसंतही होते.स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सहभाग होता.लोकजागृतीसाठी भजनांच एक नवीन ढंग त्यांनी स्वीकारला होता.भजन,कीर्तनाच्या माद्यमातून समाजामद्ये क्रांती केली.ज्यांच्या भजनामद्ये इतकी ताकद होती की,महात्मा गांधींचे मौन त्यांच्या भजनामुळे सुटले.तुकडोजी महाराजांनी १९४२ च्या उठावामद्ये चिमूर जि.चंद्रपूर येथे भजनाच्या माद्यमातून जनजागृती केली.महाराज म्हणतात की,
*”झाड झडुले शस्त्र बनेंगे,भक्त बनेगी सेना।*
*पत्तथ सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे।*
*आते है नाथ हमारे।।*”या भजनातील क्रांतिकारी विचारांनीं तुकडोजी महाराजांना इंग्रजांनी अटक केली.त्यांना २८ऑगस्ट ते २० सप्टेंबर १९४२ पर्यंत नागपुर मद्यवर्ती कारागृहामद्ये ठेवण्यात आले व २१ सप्टेंबर ते २ डिसेंबर १९४२ पर्यंत रायपुर कारागृहात ठेऊन नंतर त्यांना सोडण्यात आले.
आचार्य विनोबा भावे सह १ मे ते ११ मे १९५२ मद्ये भुदान यज्ञ दौऱ्यात स्व.आबासाहेब पारवेकर यांनी महाराजांना सहकार्य केले व केवळ १० दिवसात ११,४१० एकर जमिनी मिळवुन दिल्या.त्याची सांगता प.नेहरूंच्या हस्ते झाली.१९५५ साली ग्रामगितेचा प्रथम प्रकाशन सोहळा करून हजारो लोकांपर्यंत तुकडोजी महाराजांचे साहित्य पोहचले.१९६२ मद्ये भारत-चीन युद्धाच्यावेळी चिनी आक्रमनाचा निषेध म्हणून *”आओ चिनियो मैदान मे,देखो हिंद का हाथ”* आदि भजनाद्वारे उत्तर सीमेवर जावून भारतीय सैनिकांना प्रोत्साहन दिले.१९६५ मद्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी युध्द सिमेवर राष्ट्रजागृती दौरा केला आणि त्या ठिकाणी त्यांनी *”राष्ट्रवंदना”* म्हणजेच *”तन-मन-धन से सदा सुखी हो,भारत देश हमारा”* ही भारत मातेची वंदना लिहिली.
संतपुरुष हा त्या त्या युगाचा प्रवर्तक असतो.११ नोव्हेंबर १९४३रोजी तुकडोजी महाराजांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. विविध ठिकाणी विखुरलेल्या हजारो संघटना श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या छत्राखाली आल्या.सेवा मंडळाचा वृक्ष सतत वाढत गेला.त्याला फांद्या फुटत गेल्या.श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून मानवता ही सर्वश्रेष्ठ सेवा असून तीच खरी ईश्वरपूजा आहे हे समजावून सांगितले. आजचे सान सान बालक हे उद्याचे तरुण कार्यकर्ते होणार म्हणून त्यांच्यासाठी सर्वांगिण सुसंस्कार शिबिर वर्ग सुरू केले.एकंदरीतच वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे कार्य हे देश उद्धारासाठी महत्वाचे आहे. वं.महाराज आपल्या उपासकांना म्हणायचे की माझा जन्मदिन हा कोणीही वैयक्तिक साजरा न करता तो “ग्रामजयंती” म्हणुन साजरा करावा.महाराज आपल्या भजनात ग्रामजयंतीची महती स्पष्ट करतांना म्हणतात की,
“देशात समता नांदवा,ग्रामजयंतीचा मंत्र घ्या हो नवा”
या महान कर्मयोगी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी केलेल्या कार्यास व त्यांना विनम्र अभिवादन.
*ग्रामगीताचार्य प्रा.निलेश बी.एन. मोहकार मु.पो.कावली ता.धामणगाव रेल्वे मो.न.९९७०८४४७६७*