Home विदर्भ मुख्यमंत्री सहायता निधीस दिव्यांग कृष्णाने दिला ‘खाऊ’

मुख्यमंत्री सहायता निधीस दिव्यांग कृष्णाने दिला ‘खाऊ’

163

वाढदिवस साजरा न करता वर्षभराची बचत कोरोना लढाईस…!

यवतमाळ – कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देश ‘लॉकडाऊन’ आहे. आरोग्य यंत्रणा, पोलीस, प्रशासन आदी सर्वजण आपल्यापरीने कोरोनाची लढाई लढत आहेत. या लढाईत प्रत्येक सुजाण नागरिक आपल्यापरिने शासनास मदत करीत आहेत. यवतमाळमध्ये एका दिव्यांग मुलाने वर्षभर जमविलेला ‘खाऊ’ चक्क मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन आपल्या वाढदिवसाची अनोखी भेट कोरोना लढाईसाठी दिली.

येथील वडगाव रोड भागातील जयसिंगपुरे ले-आऊटमध्ये राहणारा कृष्णा विनोद राऊत (१३) हा जन्मत: दिव्यांग आहे. बुधवारी २९ एप्रिल रोजी त्याचा १३ वा वाढदिवस होता. मला कोणीही वाढदिवसाला काहीही भेट आणू नका तर कोरोनाची लढाई नेटाने लढणाऱ्या आपल्या मुख्यमंत्र्यांना मलाच खाऊ भेट म्हणून द्यायचा आहे, असे त्याने सर्वांना सांगितले. आपला वाढदिवस साजरा न करता वर्षभर गोळा केलेले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याची ही कल्पना त्याने आई, वडिलांना सांगितली. त्याचे वडील घरोघरी जाऊन हातगाडीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहे. हातावर पोट असलेल्या त्याच्या पालकांनीही मुलाच्या मताचा आदर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या खाऊचे पैसे असलेली ‘मनी बँक’ जशीच्या तशी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे ठरवून राऊत कुटुंबीय थेट तहसीलदारांकडे पोहचले. यवतमाळचे तहसीलदार कुणाल झालटे यांच्याकडे कृष्णाने आपला खाऊ मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला. कृष्णाच्या दातृत्वाचे कौतूक करून इतर नागरिकांनीही मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले.