Home महाराष्ट्र मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे

मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे

215

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

मुंबई – आज कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मंत्रिपरिषदेची बैठक व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे घेण्यात आली. वर्षा या शासकीय निवासस्थानाहून या कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री सर्वश्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हे मंत्री उपस्थित होते.

मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक, अनिल देशमुख, राजेश टोपे, प्रा.वर्षा गायकवाड, डॉ. जितेंद्र आव्हाड, अस्लम शेख, ॲङ अनिल परब उपस्थित होते. तर इतर मंत्री तसेच राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्याहून या बैठकीत सहभागी झाले.

या बैठकीत प्रारंभी कोरोना साथीला रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास तसेच मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करणे, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, अन्न धान्य पुरवठा, लॉकडाऊन, कम्युनिटी किचन यावर मंत्र्यांनी चर्चा करून सुचना केल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जलद चाचणीची गरज जिथे जिथे आहे तिथे प्राथम्याने करण्यात येईल असे सांगितले. होमगार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. भाजीपाला व इतर आवश्यक दुकानांच्या वेळांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले.

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठविण्याबाबत परिस्थिती पाहून योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. इतर राज्यातील मजूर, कामगार स्थलांतरीत अशा ५ .५० लाख व्यक्तींना दररोज सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यात येत आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

कोरोना : महाराष्ट्राची सद्य:स्थिती…!

• महाराष्ट्रात आजमितीस ८६८ रुग्ण असून ५२ मृत्यू आहेत. मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे ५ .९९ इतका आहे. मरण पावलेल्या ११ रुग्णांमध्ये इतर कुठल्याही आजारांची लक्षणे नव्हती.
• एकूण १७५६३ सॅम्पल्स तपासले असून १५८०८ निगेटिव्ह आहेत.
• महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले उचलल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.
• मुंबईमध्ये सर्वाधिक ५२५ रुग्ण असून ३४ मृत्यू आहेत. त्या खालोखाल पुणे येथे १३१ रुग्ण व ५ मृत्यू तसेच ठाणे विभागात ८२ रुग्ण व 5 मृत्यू आहेत.
• महाराष्ट्रातील एकंदर ११ कोटी १९ लाख ६६ हजार ६३७ लोकसंख्येपैकी ८६८ कोरोनाचे रुग्ण आढळले असून प्रत्येक १० हजार लोकसंख्येमागे ०.०७७ असे रुग्ण आहेत.
• आढळलेल्या रुग्णांमध्ये ६३ टक्के पुरुष आणि ३७ टक्के महिला आहेत. मृत्यू पावलेल्यांमध्ये ३९.७५ टक्के पुरुष आणि १३.२५ टक्के महिला आहेत.
*दहाव्या आठवड्यात भारतात ४१२५ रुग्ण आढळले. इतर देशांची दहाव्या आठवड्यातील तुलना केली तर अमेरिकेत १ लाख २२ हजार ६५३, फान्समध्ये ३७ हजार १४५, जपानमध्ये १ हजार ६९३ आणि चीनमध्ये ८१ हजार ६०१ अशी आकडेवारी आहे.
• सध्या राज्यात ३ लाख २ हजार ७९५ एन-९५ मास्क, ४१ हजार ४०० पीपीई, १० हजार ३१७ आयसोलेशन बेड, २ हजार ६६६ आयसीयू बेड आणि १ हजार ३१७ व्हेंटिलेटर्स आहेत