Home मुंबई तलावातील गाळ वाहून नेणा-या वाहतुकीची कोणीही अडवणूक करू नये –  मृद व...

तलावातील गाळ वाहून नेणा-या वाहतुकीची कोणीही अडवणूक करू नये –  मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड

95
मुंबई  – गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातून गाळ वाहून नेणा-या वाहतुकीची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत,अशी अडवणूक करणे योग्य नाही, यासाठी महसूल व पोलिस विभागाने लक्ष घालून संबंधितांवर कार्यवाही करावी,असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड यांनी दिले आहे
मृद व जलसंधारण विभागाच्या दि १५-१०-२०२४ च्या शासन निर्णयानुसार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातील जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचे खोलीकरण करण्याचे काम जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन करण्यात येते.
सदर योजनेअंतर्गत जलसाठयातील गाळ आणि नाला खोलीकरणांची कामे अशासकीय संस्थेमार्फत व लोक सहभागातून करण्यात येतात, तसेच सदर जलसाठ्यातून काढण्यात आलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात पसरवण्यात येतो, यावर स्वामित्व शुल्क (Royalty Free) माफ करून देण्याचे तरतूद आहे.
सदर बाबीस राज्य मंत्रीमंडळाच्या दि. ०४-१०-२०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.
क्षेत्रीय स्तरावर सदर योजनेंतर्गत गाळ वाहतूक करणाऱ्या वाहनांना विविध विभागाच्या यंत्रणेकडून अडवणूक केली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
तरी गाळ वाहतूक आणि वावरात पसरवण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडवणूक होणार नाही,याबाबत मृद व जलसंधारण विभाग, महसूल विभाग आणि गृह विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी सहकार्य करणे आवश्यक आहे,असे ना. संजय राठोड यांनी म्हटले आहे.