Home यवतमाळ हल्लाबोल आंदोलनाने यवतमाळ दणाणले! पिक विमा, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा आक्रमक मोर्चा;...

हल्लाबोल आंदोलनाने यवतमाळ दणाणले! पिक विमा, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा आक्रमक मोर्चा; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक…

113
यवतमाळ,दि.१० जून,(बुधवार)
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने शहरात भव्य “हल्लाबोल आंदोलन” काढण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय,यवतमाळ येथे धडकला.यावेळी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले असून सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला.

मोर्चादरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी “पिक विमा आमच्या हक्काचा,नाही कुणाच्या बापाचा”,”एक जिल्हा तीन-तीन मंत्री,तुपाशी मंत्री शेतकरी उपाशी”, “सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे”, “अनुदानित डीएपी व युरिया तात्काळ उपलब्ध करा”, “जिंदाबाद… जिंदाबाद… शेतकरी एकता जिंदाबाद” अशा आक्रमक घोषणा देत शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संपूर्ण मार्गावर घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी,यवतमाळ यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे कृषिमंत्री यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
निवेदनात प्रामुख्याने सोयाबीन,कापूस,तूर व इतर पिकांचा रखडलेला पिक विमा तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा,अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कोणत्याही जाचक अटी न ठेवता सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा,बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी,डीएपी व युरियाचा पुरेसा पुरवठा करावा,कृषीपंपांसाठी अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करावा,शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा,वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई तात्काळ द्यावी,नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत करावी तसेच पिक विमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवून सर्व प्रलंबित दावे निश्चित कालावधीत निकाली काढावेत,अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
यवतमाळ जिल्हा हा विदर्भातील प्रमुख कृषीप्रधान जिल्हा असून कापूस,सोयाबीन,तूर,हरभरा,गहू आणि ज्वारी ही प्रमुख पिके घेतली जातात.मात्र सततची नापिकी,अवकाळी पाऊस,अतिवृष्टी,वाढता उत्पादन खर्च,बोगस कृषी निविष्ठा,वीजपुरवठ्याचा प्रश्न,वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाला इशारा देत सांगितले की,निवेदनातील सर्व मागण्यांवर येत्या १५ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही तर राज्याचे पालकमंत्री मा.संजय राठोड यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्यात येईल.तसेच अधिक तीव्र लोकशाही मार्गाने राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल.
या आंदोलनात संकेत टोणे,शेतकरी नेते मनीष जाधव,प्रा.पंढरी पाठे,कॉम्रेड सचिन मनवर,कृष्णा पुसनाके,प्रा.डॉ.बबलू उर्फ अनील देशमुख,रमेश भिसणकर,राजेंद्र गौतम पाटील,आशुतोष परडखे,गणेश आप्पा झाडे,अभिलाष शेळके,पुंडलिक भरभडे,आकाश मेश्राम,विनायक देवळे,गजानन अमदाबादकर,अनुप चव्हाण,आशुतोष परडखे,अनिरुद्ध मानकर,जावेद काझी,शेषराव राठोड,विकास राठोड,चंद्रशेखर टोणे,निवृति वानखेडे,मोरे महाराज,शुभम गोडे,विजय कलंकर,धनंजय औदार्य,अतुल पारघ,मनोज राठोड,अमोल बगारे,प्रशांत वानखेडे,यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते.