Home यवतमाळ यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत उदयास आला ‘राजकीय समन्वयाचा संजय राठोड पॅटर्न’

यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत उदयास आला ‘राजकीय समन्वयाचा संजय राठोड पॅटर्न’

231

मंत्री संजय राठोड यांची राजकीय रणनीती यशस्वी; दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याला प्रगल्भ, समृद्ध आणि वैचारिक राजकारणाची परंपरा लाभली आहे. राजकीय मतभेद कितीही असले तरी जिल्ह्याच्या हिताच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय नेते एकत्र येण्याची परंपरा येथे कायम राहिली आहे. याच परंपरेची प्रचिती यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा पाहायला मिळाली. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध, महायुतीतील समन्वय आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाच्या बळावर महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार तसेच महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य या प्रक्रियेत लाभल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय चुरशीची शक्यता असतानाही ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली.

४४६ मतदार असलेल्या या मतदारसंघात सुरुवातीला निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणि लोकप्रतिनिधींची भूमिका लक्षात घेता निवडणूक अविरोध व्हावी, अशी भावना विविध स्तरांतून व्यक्त होत होती. हीच भावना लक्षात घेऊन मंत्री राठोड यांनी समन्वयाची भूमिका स्वीकारली.

समन्वयाचे राजकारण आणि महाविकास आघाडीची माघार

संख्याबळ अपुरे असतानाही महाविकास आघाडीने सुरुवातीला निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली होती. मात्र, मंत्री राठोड यांनी विविध पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेला गती मिळाली.

मुंबईतील शिष्टाई आणि महायुती धर्म

भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर अंतर्गत पेच निर्माण झाला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. तसेच अपक्ष उमेदवार सय्यद फारुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतली. या संपूर्ण प्रक्रियेत पडद्यामागे अनेक पदाधिकाऱ्यांनी समन्वयाची भूमिका बजावली. ना संजय राठोड यांचे निकटस्थ सलीम खेतानी, पश्चिम विदर्भ सहसंपर्क प्रमुख पराग पिंगळे, शैलेंद्र उर्फ बाळासाहेब दौलतकर, जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार व श्रीधर मोहोड, जिल्हा प्रमुख यशवंत पवार, राजुदास जाधव, गजानन डोमाळे, जिल्हा समन्वयक संजय हातगावकर तसेच आदिवासी आघाडी संपर्क प्रमुख सुरेश चिंचोळकर यांनी विविध स्तरांवर संवाद साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते.

समन्वयाचा नवा पॅटर्न

“निवडणूक झाली असती तरी मोठया फरकाने विजय महायुतीचाच झाला असता. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती. मित्रपक्ष, विरोधी पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी दिलेल्या सकारात्मक सहकार्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. हा जिल्ह्याच्या प्रगल्भ आणि समन्वयी राजकारणाचा हा विजय आहे,” अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली. प्रशासकीय प्रक्रियेनंतर दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाची औपचारिक घोषणा करण्यात येणार असून त्यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. मंत्री संजय राठोड यांनी दाखवलेल्या राजकीय मुत्सद्दीपणामुळे राज्याला एक ‘समन्वयाचा नवा पॅटर्न’ देखील मिळाला आहे. एकूणच, या निवडणुकीत साधलेल्या सर्वपक्षीय समन्वयाची आणि संवादाच्या राजकारणाची जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे.