Home यवतमाळ मविआचे उमेदवार साहेबराव कांबळे यांचा अर्ज दाखल; हिरा पॅलेसमध्ये नगरसेवकांच्या बैठकीत विजयाचा...

मविआचे उमेदवार साहेबराव कांबळे यांचा अर्ज दाखल; हिरा पॅलेसमध्ये नगरसेवकांच्या बैठकीत विजयाचा निर्धार

266

यवतमाळ, दि. १ जून  – यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला. यानिमित्त यवतमाळ येथील हिरा पॅलेस सभागृहात जिल्ह्यातील नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष, मित्र पक्ष तसेच अनेक अपक्ष नगरसेवकांनी उपस्थित राहून साहेबराव कांबळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना उमेदवार साहेबराव कांबळे म्हणाले की, “ही निवडणूक केवळ राजकीय नसून लोकशाही आणि संविधान वाचविण्याची लढाई आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.”

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सत्ताधारी महायुतीच्या जनविरोधी धोरणांवर घणाघाती टीका करत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला भक्कम पाठिंबा देऊन महायुतीला त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनीही मार्गदर्शन करताना संविधान आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस व महाविकास आघाडीची गरज असल्याचे सांगितले. साहेबराव कांबळे यांना विजयी करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नगरसेवकांना केले.

या बैठकीत व्यासपीठावर ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, खासदार संजय देशमुख, माजी मंत्री वसंतराव पुरके, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार संजय देरकर , शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, प्रवीण शिंदे, राजेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चे नेते बाळासाहेब गाडे पाटील, वर्षाताई निकम, शरद मैंद, राहुल ठाकरे, अशोक काका बोबडे, संजय ठाकरे, तातू देशमुख, जितेंद्र मोघे, अरविंद वाढोणकर, आरीज बेग, वनमालाताई राठोड, गोपाल अग्रवाल, फारुख भाई, महेंद्र कावळे, जाफर खान, जावेद अन्सारी, वैशाली सवई, संतोष बोरले , संजय खाडे, बबलू देशमुख, शशांक केंडे, संजय वानखडे आदी प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या रणनीतीची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन मान्यवर पदाधिकाऱ्यांनी केले तर आभार प्रदर्शन बबलू देशमुख यांनी केले.

हिरा पॅलेस येथे झालेल्या या भव्य बैठकीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नगरसेवकांची एकजूट पाहता यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचे पारडे जड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.