
यवतमाळ/ प्रतिनिधी – केंद्रातील मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज देशात बेरोजगारीचा आकडा ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे. केंद्र सरकार रोजगाराच्या बाबतीत कोणतेही ठोस पावले उचलण्यास अपयशी ठरल्याने, आजचा सुशिक्षित तरुण आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्याच्या कडेला छोटे-मोठे व्यवसाय करून प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यवतमाळ नगरपरिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके या केवळ स्वतःच्या ब्रँडिंगसाठी आणि इंस्टाग्रामवर ‘रील्स’ बनवण्यासाठी कंटेंट मिळावा म्हणून या गरिबांच्या रोजगारावर अतिक्रमणाचा हातोडा चालवत आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेस सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांनी केला आहे.
नगरपरिषद प्रशासनाच्या या अमानुष कारवाईमुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. वास्तविक पाहता, प्रशासनाकडे शहराच्या विकासाची कोणतीही उत्कृष्ट कार्यपद्धती नाही, केवळ सोशल मीडियावर चमकण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया करून सामान्यांना वेठीस धरले जात आहे. हाताला काम नसल्याने कष्टाने चार पैसे कमवणाऱ्या या तरुणांना आधार देण्याऐवजी, त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त करून नगराध्यक्षा नेमके काय साध्य करत आहेत, असा संतप्त सवाल पुसनाके यांनी उपस्थित केला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत कृष्णा पुसनाके यांनी मागणी केली आहे की, नगरपरिषद प्रशासनाने या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार करण्यासाठी अत्यंत कमी दरामध्ये व्यावसायिक गाड्या उपलब्ध करून द्याव्यात किंवा त्यांना व्यवसाय करण्यासाठी हक्काची पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. जोपर्यंत अशा प्रकारची कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही, तोपर्यंत प्रशासनाने गरिबांच्या पोटावर पाय देणारी ही कारवाई त्वरित थांबवावी. जर प्रशासनाने या तरुणांना सन्मानाने जगण्यासाठी जागा दिली नाही, तर काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. आता या आक्रमक पवित्र्यानंतर नगरपरिषद प्रशासन या सुशिक्षित बेरोजगारांना दिलासा देणार की केवळ ‘रील्स’च्या नादात गरिबांचे संसार उधळून लावणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.












































