Home यवतमाळ शिपाई भरतीत कथित गैरप्रकार, राळेगाव पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाचा एल्गार…!

शिपाई भरतीत कथित गैरप्रकार, राळेगाव पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाचा एल्गार…!

415
राळेगाव  – ग्रामपंचायत वनोजा येथील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता न पाळता कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत संतप्त युवकांनी पंचायत समिती कार्यालय राळेगाव येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात पंचायत समिती राळेगाव येथील गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले असून या निवेदनाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ, मा. उपविभागीय अधिकारी राळेगाव, मा. ठाणेदार, पोलीस स्टेशन राळेगाव तसेच मा. सरपंच व सचिव, ग्रामपंचायत वनोजा यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
निवेदनानुसार, ग्रामपंचायत वनोजा येथे सुमारे ११ महिन्यांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात शिपाई पदासाठी नियुक्ती करण्यात आली होती. संबंधित पदाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही नवीन भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र व गरजू उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा लेखी तक्रारी व निवेदने सादर करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने संतप्त युवकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. शिपाई पदासाठी नवीन अर्ज मागवून पात्र उमेदवारांची निवड पारदर्शक व न्याय्य पद्धतीने करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
या आमरण उपोषणात जितेंद्र नरेश खोड़े, विकास अशोक घिनमिने, सुरज घनश्याम किन्हेकर व श्रीकांत महादेव बेलखोडे हे आंदोलनकर्ते सहभागी होणार असून त्यांनी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. या आंदोलनामुळे पंचायत समिती परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट..
ग्रामपंचायत वनोजा येथील शिपाई भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून नव्याने अर्ज मागवण्यात यावेत, या मागणीसाठी दि. १७ फेब्रुवारी २०२६ पासून पंचायत समिती राळेगाव येथे जितेंद्र नरेश खोड़े, विकास अशोक घिनमिने, सुरज घनश्याम किन्हेकर व श्रीकांत महादेव बेलखोडे हे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.