Home यवतमाळ दिग्रस येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्सव; आज मिरवणूक

दिग्रस येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्सव; आज मिरवणूक

231

‘संत सेवालाल महाराज यांच्या नावातील ‘सेवा’ ही भावना आत्मसात करा’ – मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मंदिर भूमीपूजन

दिग्रस : जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीचे औचित्य साधून आज रविवारी दिग्रस येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारी सकाळी संत सेवालाल महाराज यांच्या भव्य मंदिराचा भूमीपूजन सोहळा पार पडला.

यावेळी बोलताना मंत्री संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या विचारांचे स्मरण करून ‘जाणजो, छाणजो, पचच माणजो’ असा मौलिक संदेश दिला. हा वास्तववादी संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे, असे त्यांनी नमूद केले. भेटणाऱ्या माणसांना ओळखा, त्यांना पारखा आणि मगच विश्वास ठेवा, हा संदेश आजही लागू होतो, आहे असे ते म्हणाले. तसेच, संत सेवालाल महाराज यांच्या नावातील ‘सेवा’ ही भावना आत्मसात करून समाजसेवेचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

आज महेश नगर (गार्डन) येथे मंदिराचे भूमीपूजन झाल्यानंतर नाईक-शास्त्री पुतळ्याजवळ झेंडा व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी दिग्रस व परिसरातील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजेपासून बंजारा लेंगी गायन व भजनाचा कार्यक्रम झाला.
उद्या सोमवारी मोटार सायकल रॅली व मिरवणूक होणार आहे. सकाळी ९ वाजता नाईक -शास्त्री पुतळ्यापासून मोटरसायकल रॅली निघणार आहे. सकाळी १०:३० वाजता संत सेवालाल महाराजांची मिरवणूक निघेल. दुपारी १ वाजता मिरवणुकीची सांगता आणि त्यानंतर महेश नगर गार्डन येथे महाप्रसाद व जेवणाचा कार्यक्रम होणार आहे.