Home यवतमाळ मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण – तात्काळ बंदोबस्ताची मागणी

मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण – तात्काळ बंदोबस्ताची मागणी

349

यवतमाळ शहरातील वडगाव रोड परिसरातील सहकारनगर, महादेवनगर, राणाप्रताप नगर तसेच परिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात मोकाट कुत्र्यांकडून अबालवृद्धांवर सातत्याने हल्ले होत असून दररोज दोन ते तीन नागरिकांना कुत्रे चावत असल्याच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे अनेकांना गंभीर दुखापत होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज घडलेल्या एका गंभीर घटनेत अंजली चौधरी (निवृत्त शिक्षिका) यांच्यावर गुलशन प्रोव्हिजन दुकानाजवळ, तसेच यवतमाळ नगराध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना भोवळ आल्यामुळे नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असून नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. विशेषतः लहान मुले, महिला व वृद्ध नागरिकांना या कुत्र्यांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. शाळेत जाणारी मुले तसेच नागरिक भीतीपोटी घराबाहेर पडण्यास घाबरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी यवतमाळ नगरपालिकेकडे मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागाने या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, यवतमाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियदर्शिनी उईके यांच्या निवासस्थानाच्या परिसरातच सदर घटना घडत असल्याने नगरपालिकेने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन प्रभावी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.