Home विदर्भ जन्मदात्या बापाकडूनच मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप हेलियम गॅसचा सिलिंडर देऊन वापराचा...

जन्मदात्या बापाकडूनच मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप हेलियम गॅसचा सिलिंडर देऊन वापराचा व्हिडिओ पाठवल्याचा धक्कादायक दावा,  “राजकीय दबावामुळे एफआयआर नोंद नाही; डॉक्टर आईची न्यायासाठी झुंज”

868

वर्धा/यवतमाळ – स्वतःच्या जन्मदात्या वडिलांकडूनच सतत मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. मुलीला आत्महत्येचा मार्ग दाखवत थेट हेलियम गॅसचा सिलिंडर आणून देणे व तो कसा वापरायचा याचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठविल्याचा गंभीर आरोप मृत तरुणीची आई डॉ. सुषमा अरुण वानखेडे यांनी केला आहे. या प्रकरणात राजकीय दबावामुळे पोलिस कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

डॉ. सुषमा अरुण वानखेडे (रा. ड्रिमझलँड सिटी, सावंगी मेघे, वर्धा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी नक्षत्रा अरुण वानखेडे हिने 6 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री हेलियम गॅस हुंगून आत्महत्या केली. पती डॉ. अरुण उत्तम वानखेडे, नणंद प्रमिला गजानन विणकरे व रेवती मोहनराव देवतळे यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.
डॉ. सुषमा यांच्या आरोपानुसार, पती अरुण वानखेडे यांचे रेवती देवतळे यांच्याशी अनैतिक संबंध होते. या संबंधांना सुषमा व त्यांची मुलगी नक्षत्रा यांचा तीव्र विरोध होता. याच कारणावरून दोघींना वारंवार मारहाण, अपमानास्पद वागणूक व मानसिक त्रास दिला जात असे. “तू कुटुंबासाठी कलंक आहेस, तुझा पायगुण चांगला नाही, तू मरून जा,” अशा शब्दांत नक्षत्राला सतत टोमणे मारले जात होते. याच मानसिक छळाचा कळस म्हणजे पित्यानेच हेलियम गॅसद्वारे आत्महत्या करता येते, असे सांगत सिलिंडर आणून देणे व वापराचा व्हिडिओ पाठविणे, असा आरोप आहे. अखेर या छळाला कंटाळून नक्षत्राने आपले जीवन संपविले.
वर्धा पोलिसांची भूमिका संशयास्पद
घटनेनंतर आरोपी पती फरार झाला. मुलीचे अंत्यसंस्कार डॉ. सुषमा यांनी एकट्याने पार पाडले. त्यानंतर 16 डिसेंबर 2025 रोजी सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात त्यांनी पती डॉ. अरुण उत्तम वानखेडे, नणंद प्रमिला गजानन विणकरे व रेवती मोहनराव देवतळे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. मात्र, गुन्हा दखलपात्र असतानाही अद्याप एफआयआर नोंदविण्यात आलेला नाही. तपास अधिकारी विशाल डोणेकर व ठाणेदार पतीला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही डॉ. सुषमा यांनी केला आहे.
न्यायासाठी धावपळ
या प्रकरणी डॉ. सुषमा यांनी वर्धा पोलिस अधीक्षक, ठाणेदार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालविकास विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. 26 डिसेंबर रोजी त्यांनी वर्धा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. मात्र, मोबाईल बाहेर ठेवल्याने ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपातील पुरावे सादर करता आले नाहीत. “माझ्याकडे पतीच्या विकृत वागणुकीचे ठोस ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग व व्हॉट्सअॅप चॅट उपलब्ध आहेत. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी आर्त मागणी डॉ. सुषमा वानखेडे यांनी केली आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
फिर्यादी : डॉ. सुषमा अरुण वानखेडे (खासगी प्रॅक्टिस, वर्धा)
मृतक : नक्षत्रा अरुण वानखेडे
आरोपी : डॉ. अरुण वानखेडे, प्रमिला गजानन विणकरे, रेवती मोहनराव देवतळे
गंभीर आरोप : पित्यानेच मुलीला हेलियम गॅस देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले.
मागणी : दोषींवर कठोर कारवाई करून न्याय द्यावा