Home महत्वाची बातमी आईच्या नावावरची जमीन मुलाच्या नावे करण्यासाठी १० हजाराच्या लाचेची मागणी, तलाठ्याला रंगेहाथ...

आईच्या नावावरची जमीन मुलाच्या नावे करण्यासाठी १० हजाराच्या लाचेची मागणी, तलाठ्याला रंगेहाथ अटक

143

 

वाशिम एसिबी पथकाची धडाकेबाज कारवाई

फुलचंद भगत
वाशिम:-आपल्या हक्काची शेतजमीन, जी रक्ताचं पाणी करून आई-वडिलांनी कमावली, ती नावावर करण्यासाठीही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घराचे उंबरठे झिजवावे लागतात, ही लोकशाहीतील सर्वात मोठी शोकांतिका आहे. आईच्या निधनानंतर किंवा तिच्या नावावर असलेली जमीन मुलाच्या नावे करण्यासाठी ‘रवींद्र रंगनाथ खुळे’ नावाच्या तलाठ्याने चक्क १५ हजार रुपयांची मागणी केली. अखेर १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना वाशिम एसीबीने या अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे.
एक शेतकरी आपल्या हक्काच्या जमिनीचे फेरफार करण्यासाठी आणि वारस नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे आशेने जातो. मात्र, तिथे गेल्यावर त्याला सहकार्याऐवजी ‘लाचेची’ अट घातली जाते. आरोपी रवींद्र खुळे (वय ४९), जो सध्या मंगरूळपीर येथे कार्यरत आहे, त्याने तक्रारदाराच्या आईच्या नावावर असलेली जमीन मुलाच्या नावे करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली. पंचांसमक्ष झालेल्या पडताळणीत त्याने १५ हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. १५ जानेवारी रोजी दुपारी १० हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली.
एसीबीने केलेल्या कारवाईत रवींद्र खुळे याच्याकडे लाचेच्या १० हजार रुपयांव्यतिरिक्त आणखी २७६० रुपये आणि एक महागडा मोबाईल सापडला आहे. इतक्यावरच न थांबता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, भ्रष्टाचारातून त्याने आणखी किती मालमत्ता जमा केली आहे, याचा शोध घेतला जात आहे.
ही धडाकेबाज कारवाई वाशिम एसीबीच्या पोलीस निरीक्षक अलका गायकवाड आणि पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार नितीन टवलारकर, विनोद अवगळे, योगेश खोटे, महेश परमेश्वरे, नाविद शेख आणि मंगेश देवकते यांचा समावेश होता.

बळीराजाचा टाहो कोण ऐकणार?
आजही ग्रामीण भागात सातबारावर नाव चढवण्यासाठी किंवा जमिनीचे फेरफार करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांच्या मागे हात जोडून फिरावे लागते. मजुरी करून किंवा पीक विकून येणाऱ्या पैशांवर हे भ्रष्ट अधिकारी डोळा ठेवतात, ही संतापजनक बाब आहे. आईच्या जमिनीसाठीही मुलाला लाच द्यावी लागत असेल, तर या व्यवस्थेत माणुसकी उरली आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.