Home बुलडाणा खडकपूर्णा धरणाचे १९ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना पूरस्थितीचा धोका

खडकपूर्णा धरणाचे १९ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना पूरस्थितीचा धोका

171

 

प्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव मही :-गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकपूर्णा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सर्व १९ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यात १२ दरवाजे एक मीटर व ७ दरवाजे दीड मीटरने उघडल्याने २४७३.५४ घनमीटर प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू आहे. यामुळे देऊळगाव महीकडील जुन्या पुलावरून पाणी वाहू लागले असून, वाहतूक बंद करून वाहनांना नव्या पुलावर वळविण्यात आले आहे.

नदीपात्रातील वाढत्या पाण्यामुळे निमगाव वायाळ येथील कोल्हापुरी बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असून, टाकरखेड भागिले, निमगाव गुरु, सावगी टेकाळे, साकेगाव दिग्रस खु. आदी गावांना पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली गेली असून, गुरेढोरे व साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रशासनाचे आवाहन आहे.

उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी नागरिकांना नदीकाठ टाळण्याचे आवाहन केले आहे. शाखा अभियंता सुमित वेसनसुरे यांनी सांगितले की, पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातील आवक वाढल्याने एक लाख क्युसेसपर्यंत विसर्ग सुरू आहे.