Home यवतमाळ खोट्या आश्वासनांना ठोस उत्तर देणारी “७/१२ कोरा यात्रा” – यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी...

खोट्या आश्वासनांना ठोस उत्तर देणारी “७/१२ कोरा यात्रा” – यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्त्यांचा ठाम पाठिंबा!

117

तिवरी,ता.दारव्हा,जि.यवतमाळ | दि.११ जुलै २०२५
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि खोट्या निवडणुकीच्या आश्वासनांचा पर्दाफाश करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या “७/१२ कोरा यात्रा” ला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.


ही ऐतिहासिक यात्रा डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पापळ (जि.अमरावती) येथून सुरू होऊन, साहेबराव करपे (चिलगव्हाण,जि. यवतमाळ) या पहिल्या सरकारी नोंदणी शेतकरी आत्महत्येच्या गावात पोहोचणार आहे. “कोरा ७/१२ म्हणजेच कर्जमुक्त शेतकरी” या संकल्पनेभोवती केंद्रित असलेली ही यात्रा केवळ एक पदयात्रा नसून, ती एक व्यापक कृषी नितीविरोधी जनआंदोलन आहे.
याच पार्श्वभूमीवर दिनांक १० जुलै रोजी तिवरी (ता.दारव्हा) येथे झालेल्या यात्रेत प्रा.पंढरी पाठे यांनी मा.बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी व नागरिकांना संबोधित करत सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका केली.शेतकऱ्यांच्या फसव्या कर्जमाफ्या,हमीभाव न मिळणे,वीजबिलाचा बोजा,पाणी व जमिनीवरील हक्कांबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली.
या वेळी राजमुद्रा प्रतिष्ठान, यवतमाळ व जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये अंकुश वानखडे,कृष्णा पुसनाके,राजमुद्रा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन मिर्झापुरे व त्यांच्या मित्रपरिवारासह कॉम्रेड सचिन मनवर,नाकापार्डीचे युवा सरपंच प्रेम धुर्वे,प्रा.गौरीशंकर कनाके,हेमंत भोयर,जुबेर सय्यद,ओम कुदळे, पवन जाधव आणि इतर अनेक शेतकरीहितदर्शी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
शेतकरी आत्मसन्मान,कर्जमुक्ती आणि शाश्वत शेती हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन यावेळी नितीन मिर्झापूरे यांनी  केले.