Home यवतमाळ ब्रह्मपुरीतील त्या शाळेतील मुख्याध्यापकाचे पद तात्काळ रद्द करून ज्यादा वेतनाची वसुली करण्याचे...

ब्रह्मपुरीतील त्या शाळेतील मुख्याध्यापकाचे पद तात्काळ रद्द करून ज्यादा वेतनाची वसुली करण्याचे शिक्षणाधिकाऱ्याचे आदेश

523

ब्रह्मपुरी/ प्रतिनिधी

बोगस शालार्थ आयडी व मुख्याध्यापक नियुक्ती घोटाळ्याचे प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. याच धर्तीवर मुख्याध्यापक पदाच्या निकषांची पूर्तता न करता, अगदी नियमबाह्य पद्धतीने ब्रम्हपुरी तालुक्यातील ‘त्या’ शाळेतील शिक्षकांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्यामुळे ते अनेक महिन्यांपासून त्या शाळेतील मुख्याध्यापक पद भोगत आहेत. तत्कालीन शिक्षण उपसंचालक यांनी त्या शाळेत मुख्याध्यापक पदासाठी मान्यता दिली होती. नियमबाह्य दिलेली मान्यता रद्द करून ज्यादा वेतनाच्या वसुली करण्याच्या शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या आदेशाला संस्था चालकाने केराची टोपली दाखविली. अद्यापही मुख्याध्यापकाचे पद रद्द न करता, त्याची ज्यादा वेतनाची वसुली न केल्यामुळे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी संस्था चालकाला परत आदेश दिले आहेत ._
_राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत चालविल्या जाणार्‍या शाळांना शाळेतील विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर पदे मंजूर करणे आवश्यक असते. यासाठी विद्यार्थी संख्या, शाळा प्रकारची माहिती आदी माहितीच्या आधारे व शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेले निकष विचारात घेऊन त्यानुसारच सर्व शाळांसाठी शिक्षक व शिक्षकेतर पदे शाळा निहाय मंजूर केली जातात. शाळांच्या संच मान्यता शिक्षणाधिकारी हे त्यांना वितरीत करतात. असे असतांना सुद्धा, शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना धाब्यावर बसविल्याचा प्रकार ब्रम्हपुरी तालुक्यातील ‘त्या’ शाळेत घडल्याचे कळते._
_ब्रह्मपुरी शहरातील त्या शिक्षकाची शाळेच्या मुख्याध्यापक पदी गेल्या अनेक महिन्यांपासून नियुक्ती झाली असून ते मुख्याध्यापक पद भोगत आहेत. मात्र, बोगस शालार्थ आयडी व मुख्याध्यापक नियुक्ती घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे तालुक्यातील या प्रकारची चर्चा गावात सुरू आहे._
एकाच संस्थेच्या दोन शाळा असतांना, दोन मुख्याध्यापक पद शासनाने ठरवून दिलेल्या निकषांत बसत नाहीत, तरी सुद्धा, मुख्याध्यापक पद मंजूर करून, व केवळ संस्थाचालकाच्या मर्जीतले असल्यामुळे जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत मुख्याध्यापक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ._

त्या ब्रह्मपुरी शाळेतील मुख्याध्यापक पदाच्या नियमबाह्य पद्धतीने केलेल्या नियुक्तीची तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. ब्रम्हपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांनी तत्कालीन शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्या 17 जून 2022 च्या आदेशाने नियमबाह्य पद्धतीने मुख्याध्यापक यांची नियुक्ती केली होती. सदर बाब शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी 22 मे 2024 ला नियमबाह्य दिलेली मान्यता तात्काळ रद्द करून जादा वेतनाची वसुली करण्याबाबत सदर संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांना आदेश दिले होते. मात्र ब्रह्मपुरी येथील संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांनी शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कार्यालयाने परत 11 जुलै 2024 रोजी सदर संस्थेचे अध्यक्ष व सचिवांना मुख्याध्यापक यांचे मुख्याध्यापक पद रद्द करून त्यांची वसुली करण्याबाबत सूचित केले होते. मात्र गंभीर बाब असताना सुद्धा संस्थेकडून अद्यापही मुख्याध्यापक यांच्यावर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या पत्रानुसार कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. मुख्याध्यापक यांचे पद तात्काळ रद्द करून त्यांची वसुली करूनच माहे में 2025 चे वेतन अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक चंद्रपूर यांच्या कार्यालयात सादर करण्याचे व तसा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश राजेश पातळे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी ब्रह्मपुरी संस्थाध्यक्ष व सचिवांना 15 मे 2025 च्या पत्रांनुसार दिला आहे._