Home यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड यांच्या “वाढदिवसानिमित्त” आरोग्य संकल्प अभियान…

पालकमंत्री संजय राठोड यांच्या “वाढदिवसानिमित्त” आरोग्य संकल्प अभियान…

150

पाच हजार ४३३ रूग्णांची तपासणी व उपचार

दोन हजार ६१० रूग्णांवर सावंगी मेघे येथे उपचार होणार

यवतमाळ – राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्रस, दारव्हा, नेर येथे आरोग्य संकल्प अभियान राबविण्यात आले. माँ आरोग्य सेवा समिती यवतमाळ व दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात तिन्ही तालुक्यांत एकूण पाच हजार ४३३ रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गंभीर आजार असलेल्या दोन हजार ६१० रूग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी (मेघे) येथे पाठविण्यात येणार आहे.

शासकीय रूग्णालयात अनेक आजारांवर मोफत उपचार होतात. मात्र कर्करोग, किडनी, मेंदूविकार अशा गंभीर आजारांवरील उपचार महागडे व खर्चिक आहेत. मतदारसंघातील नागरिकांचा अशा महागड्या आजारांवरील उपचारासाठी एक रूपयासुद्धा खर्च होवू नये. त्यांच्यावर सर्व उपचार मोफतच व्हावे, यासाठी दर तीन महिन्यांनी दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून नियमित आरोग्य तपासणी शिबीर घेतले जाते. आरोग्य संकल्प अभियानांतर्गत दिग्रस, नेर व दारव्हा येथे हे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व औषध वितरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तिन्ही तालुक्यांत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

नेत्ररोग, मेडिसिन, बालरोग, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग, अस्थिरोग, कान, नाक, घसा, त्वचारोग, श्वसनरोग, दंत व मुख रोग, मानसिक विकार, हृदयरोग, मुत्ररोग, मेंदूविकार, न्युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, रेडिओलॉजी, आयुर्वेदिक आणि कर्करोग रूग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. याशिबिरात दिग्रस तालुक्यात एक हजार ८२४, नेर एक हजार ७६० तर दारव्हा तालुक्यात एक हजार ८४९ अशा एकूण पाच हजार ४३३ रूग्णांनी लाभ घेतला. या रूग्णांमधून दोन हजार ६१० रूग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी मेघे येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.

या रूग्णांना दिग्रस, नेर, दारव्हा येथून पालकमंत्री संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयातून पुढील मोफत उपचारासाठी सावंगी मेघे येथे नेले जाणार आहे. तेथे तपासणी केल्यानंतर ज्या रूग्णांवर सावंगी मेघे येथे उपचार होणार नाही, अशा रूग्णांना नागपूर, मुंबई येथे उपचारासाठी घेवून जाण्यात येणार आहे. सर्व रूग्णांवर सर्व उपचार शासकीय योजनांमधून मोफत केले जातात. ज्या आजारांवर शासकीय योजनांमधून उपचार शक्य नाही, त्या उपचारांसाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात माँ आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. गंभीर आजारांवरील महागडे उपचार, रूग्णांच्या विविध रक्त तपासण्या, औषधी व सर्व रूग्णांसह त्यांच्या एका नातेवाईकांचा येण्या – जाण्याचा व जेवणाचा सर्व खर्च पालकमंत्री संजय राठोड उचलतात.
सावंगी मेघे येथे उपचारासाठी जाणाऱ्या रूग्णांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी यवतमाळप्रमाणेच तेथील दवाखान्यात रूग्णसेवक नेमण्यात आले आहे. हे रूग्णसेवक दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील शिबिरांमधून उपचारासाठी जाणाऱ्या रूग्णांना सर्व सेवा पुरवतात. त्यांच्या विविध तपासण्या, औषधी, राहण्याची, जेवणाची व्यवस्था हे रूग्णसेवक करून देतात. दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यात नियमित होणाऱ्या या आरोग्य शिबिरांमुळे विविध आजारांचे रूग्ण घटत असल्याचे दिसून येत असल्याचा अनुभव या शिबिरात कार्यरत डॉक्टरांनी सांगितला. संजय राठोड यांची समाजसेवक आणि रुग्णसेवक म्हणून असलेली ओळख या आरोग्य संकल्प शिबिरातून नव्याने अधोरेखित झाली. रुग्णसेवक म्हणून जनसामान्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्याची तळमळ मंत्री संजय राठोड यांच्या कामातून आजही प्रकर्षाने जाणवते, अशी प्रतिक्रिया यावेळी अनेक रूग्णांनी दिली.