Home यवतमाळ जबरी चोरी प्रकरण उघड…!

जबरी चोरी प्रकरण उघड…!

527

दिवसा ढवळ्या झालेल्या जबरी चोरीचा यवतमाळ पोलीसांनी केला छडा – ५ आरोपी पुणे येथून ताब्यात

यवतमाळ : यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हद्दीतील करळगाव घाटात दिनांक १३ मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पोस्टमास्तर यांच्यावर झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने ५ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे ६ लाख ५९ हजार रुपयांची रोकड व गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन मोटारसायकल असा एकूण ७ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बाभुळगाव येथील पोस्टमास्तर श्री. सुभाष नारायण बारसे (वय ५९, रा. तिरुपती नगर, लोहारा, यवतमाळ) हे १३ मे रोजी आपल्या ऍक्टिव्हा दुचाकीने मुख्य पोस्ट ऑफिस यवतमाळ येथून ७ लाख रुपये रोख रक्कम घेऊन बाभुळगाव येथे निघाले होते. दरम्यान, करळगाव घाटात त्यांच्या मागून आलेल्या दुचाकीवरील दोघा अज्ञात इसमांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांचे वाहन व रोख रक्कम लंपास केली होती.

या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या.

तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे स्था. गु. शा. पथकाने तपास करत पाच संशयित – पियुष कावळे, राजेश ठोंबरे, प्रतिक घरात, रुतीक तुरणकर व सावन पंचभाई – यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती मिळवली. पियुष कावळे हा ग्रामीण डाक सेवक असून तो काही दिवसांपासून रजेवर होता, यावरून त्याच्यावर संशय गडद झाला.

पोलिसांनी कळंब हद्दीतून फियादींचे ऍक्टिव्हा वाहन हस्तगत केले. यानंतर मोबाईल विश्लेषणाच्या आधारे आरोपी पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ पुण्यात जाऊन चार आरोपींना तर पाचव्या आरोपीला यवतमाळ येथून ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून एकूण ६.५९ लाख रुपये रोख, शाईन आणि स्प्लेंडर कंपनीच्या मोटारसायकल असा एकूण ७.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सतिश चवरे, पो.उप.नि. गजानन राजमल्लू, पोलीस अंमलदार साजीद से. हाशम, बंडू डांगे, रुपेश पोली, योगेश डगवार, प्रशांत हेडाऊ, कविश पाळेकर, आकाश सहारे, आकाश सूर्यवंशी, दिगंबर पिलावर व देवेंद्र होले यांच्या टीमने केली.

यवतमाळ पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.